लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील म्हात्रेनगर भागात राहत असलेल्या एका कुटुंबातील सदस्याचा बुधवारी वाढदिवस होता. कुटुंबातील सर्व सदस्य यानिमित्ताने एकत्र आले होते. यावेळी पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून संतप्त पतीने पत्नीला सुरीने मारहाण केली. हा वाद सोडविण्यासाठी मुलगा मध्ये पडल्याने वडिलांनी त्यालाही शिवीगाळ करुन सुरीने हल्ला करुन जखमी केले.

रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी मुलाने वडिलांविरुध्द तक्रार केली आहे. सुरेश सखाराम पैलकर (५२) असे वडिलांचे नाव आहे. त्यांचा २८ वर्षाचा मुलगा सुरज याने वडील सुरेश यांच्या विरुध्द तक्रार केली आहे.पोलिसांनी सांगितले, सुरजच्या आई वडिलांचे दोन वर्षापासून पटत नाही. त्यामुळे सुरजची आई सुलोचना ही त्यांच्या कर्नाटक मधील आईच्या घरी राहतात. बुधवारी मुलगा सुरज यांचा वाढदिवस होता. त्यामुळे आई त्याला औक्षण करण्यासाठी कर्नाटकहून आली होती. सुरज नोकरी करतो.

आणखी वाचा-डोंबिवलीत रक्षाबंधनासाठी गेलेल्या कुटुंबीयांचे घर लुटले

घरात वाढदिवसाचा कार्यक्रम रात्री पार पडल्यानंतर रात्री साडे ते अकरा वाजताच्या दरम्यान सुरजच्या आई, वडिलांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी स्वयंपाक घरातील सुरी घेऊन त्या साधनाने पत्नी सुलोचनाला मारहाण सुरू केली. सुरज हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले. त्यावेळी वडील सुरेश यांनी सुरजच्या छातीवर धारदार सुरीने वार केला. यामध्ये त्यांना दुखापत झाली. तरीही सुरेश यांनी आई, मुलाला मारण्याची धमकी दिली. वडिलांकडून पुन्हा काही गैरप्रकार होण्याची शक्यता विचारात घेऊन मुलगा सुरज याने वडिलांविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक एन. जी. काते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife and children beaten by man on birthday in dombivli mrj