लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: आपल्या प्रेमसंबंधात नियमित अडथळा ठरत असलेल्या पतीला पत्नीने आपल्या मित्र आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने डोंबिवलीतील ठाकुर्ली चोळेगाव मधील राहत्या घरात ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी पतीचा मृतदेह एका टेम्पोमध्ये भरुन तो कसारा घाटात फेकला असल्याचा प्रकार शहापूर पोलिसांच्या अधिपत्याखालील कसारा पोलिसांनी उघडकीला आणला आहे.
गेल्या महिन्यात ठाकुर्लीतील चोळेगाव मधील बंदिश पॅलेस हाॅटेल जवळील घरात रात्री मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. सुशील पाराजी कोथेरे (२५, रा. बंदिश पॅलेस हाॅटेल जवळ, चोळेगाव, ठाकुर्ली) असे मयत व्यक्तिचे नाव आहे. मयताची पत्नी कोमल सुशील कोथेरे (२४), कोमलचा मित्र मोनुकुमार त्रलोकनाथ खरवार (२८, रा. पिसवली), साथीदार अभिषेक गुप्ता यांच्या विरुध्द शहापूर पोलीस ठाण्यातील कसारा पोलीस चौकीत नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रेयन राठोड यांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा… ठाणे: घोडबंदर भागात रिक्षा उलटून लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू
शहापूर पोलिसांनी सांगितले, आरोपी कोमल कोथेरे आणि तिचा मित्र मोनुकुमार खरवार यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय कोमलचा पती सुशील याला होता. या विषयावरुन कोमल आणि सुशील यांच्यात दररोज भांडणे होत होती. या भांडणामुळे कोमल अस्वस्थ होती. सुशीलमुळे आपल्याला कोमलशी संवाद साधता येत नाही म्हणून आरोपी मोनुकुमार अस्वस्थ होता. पती बरोबरच्या सततच्या भांडणामुळे कोमल त्रस्त होती.
आपल्या प्रेमसंबंधात सुशील अडथळा येत असल्याने कोमल आणि तिचा मित्र मोनुकुमार यांनी सुशीलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. १२ एप्रिल रोजी मध्यरात्री मोनुकुमार आणि त्याचा मित्र अभिषेक गुप्ता कोमलच्या घरी आले. त्यावेळी सुशील झोपला होता. घरात आल्यानंतर मोनुकुमार, अभिषेक जवळील लोखंडी सळईचे फटके झोपेत असलेल्या सुशीलच्या मान आणि डोक्यात मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा विषय पोलिसांना कळला तर आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपींनी रात्रीतच एक टेम्पो भाड्याने केला. पोत्यामध्ये सुशीलचा मृतदेह भरुन तो मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात गणपती मंदिरा जवळील खोल दरीत फेकून दिला.
हेही वाचा… कल्याणमध्ये गुंडांचा तलवारी, सुरे घेऊन वावर; व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला
कसारा घाटात खोल दरीत एक इसमाला मारुन फेकून दिल्याची माहिती शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक एस. डी. गिते यांना मिळाली. त्यांनी बचाव पथकाच्या साहाय्याने मृतदेह दरीतून बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटविताना ते धागेदोरे डोंबिवलीतील चोळे गावपर्यंत आले. या तपासातून आरोपी कोमल आणि तिचा मित्र मोनुकुमार आणि त्याच्या साथीदाराविरुध्द पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
या घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.