गावात ठिकठिकाणी राऊटर जोडणीचे काम सुरू
परिसर स्वच्छता, पाणीपुरवठा, तंटामुक्ती आणि राजकारणविरहित स्थानिक प्रशासन व्यवस्था यामुळे ठाणे जिल्ह्य़ात आदर्श ठरलेल्या मुरबाड तालुक्यातील कान्होळ गावाने संपूर्ण गावगाठ हद्दीत वायफाय सेवा कार्यान्वित करून स्वतला आधुनिक जगाशी जोडले आहे. मंगळवारी राऊटर जोडणीचे काम सुरू झाले. येत्या दोन दिवसांत ही सेवा कार्यान्वित होणार आहे.
इंटरनेट सुविधा ही अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याइतकीच प्राथमिक गरज ठरली आहे. शहरात रेल्वे स्थानके, महत्त्वाचे चौक तसेच काही महाविद्यालयांनी वायफाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ठाणे महापालिकेने तर संपूर्ण शहरात वायफाय देण्याची घोषणा नुकतीच केली. आधुनिकीकरणाचे हे वारे कान्होळ गावातही पोहोचले आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल पद्धतीचे शिक्षण उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी टॅब आहेत. बाराशे लोकसंख्या असलेल्या कान्होळमध्ये सुमारे शंभरेक अॅँण्ड्रॉइड मोबाइल आणि २५ संगणक आहेत. इंटरनेट सुविधेपोटी प्रत्येकी किमान २०० रुपये खर्च गृहीत धरला तरी दरमहा गावकऱ्यांना २० हजारांहून अधिक रक्कम मोजावी लागत होती. त्यामुळे त्याऐवजी संपूर्ण गाव वायफाय करण्याची कल्पना गावातील शिक्षक जीवन शेळके यांना सुचली. स्थानिक विशाखा केबलचे तानाजी घोडविंदे आणि सुशिक्षित तरुण एकनाथ हरड यांनी ती कल्पना उचलून धरली.
गावकऱ्यांना विनामूल्य इंटरनेट
गावठाणाचे क्षेत्रफळ साडेसात एकर असून १२६ घरे आहेत. वाय फाय सुविधेसाठी गावात सात ठिकाणी राऊटर बसविण्यात आले आहेत. एका राऊटरमुळे ३०० मीटर क्षेत्रात इंटरनेट सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे संपूर्ण गावात इंटरनेट सुविधा मिळते. त्यामुळे आता ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, मध्यवर्ती ठिकाणी असलेले हनुमानाचे मंदिर, समाजगृह तसेच घरोघरी इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेसाठी लागणारे दरमहा तीन ते चार हजार रुपये शुल्क ग्रामपंचायत भरणार आहे. त्यामुळे समस्त गावकऱ्यांना ही सेवा विनामूल्य मिळणार आहे.