कोयनेच्या जंगलातून प्रवास करत मुरबाडमध्ये दाखल झाल्याचा अंदाज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झपाटय़ाने होणाऱ्या नागरीकरणामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील महत्त्वाचे शहर बनत चाललेल्या अंबरनाथ शहराच्या वेशीवर आजही वनसंपदा टिकून आहे. येथील वृक्षराजी, वन्यजीव, कीटक, निसर्ग अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनले असतानाच आता या ठिकाणी चक्क रानगवा आढळून आला आहे. सहसा कोयना क्षेत्रात आढळणारा हा रानगवा सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांतून प्रवास करत मुरबाड व अंबरनाथच्या मध्ये विस्तारलेल्या बारवीच्या जंगलात दाखल झाला असावा, असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.

भारतीय गवा जगात अन्यत्र कुठेही आढळत नाही. महाराष्ट्रात कोयनाचे खोरे किंवा ताडोबाच्या जंगलात काही गवे शिल्लक असल्याचे बोलले जाते. गेल्या तीन दिवसांपासून मुरबाड तालुक्यातील मासले गावाच्या हद्दीत रानगवा आढळला. प्रथमदर्शनी अनेकांना तो बैल वाटला. मात्र अश्वमेध प्रतिष्ठानचे रोहन हरड आणि विशाल हरड या कार्यकर्त्यांनी अधिक तपास केला असता हा रानगवा असल्याचे सिद्ध झाले. सहसा रानगवा हा कोयना क्षेत्रात आढळतो. तरुण गव्याला कळपातून बाहेर काढण्यात येते. त्यामुळे नव्या क्षेत्रांसाठी हे गवे जंगल ते जंगल प्रवास करत राहतात. त्यातूनच सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांतून हा गवा येथे आल्याची शक्यता आहे, अशी शंका अश्वमेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वन्यजीव अभ्यासक अविनाश हरड यांनी व्यक्त केली.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी शहापूरजवळील माहुली गडाच्या जंगलात २०१० मध्ये गवा असल्याचे पुरावे मिळाले होते. मात्र नंतर तो कुठे गेला याची माहिती मिळाली नव्हती. याच भागात पूर्वी मरळ नावाचा वेगळा आणि मोठा मासा मिळायचा. मात्र परिसरातील तलाव बुजल्याने हा मासा आता नामशेष झाला आहे. तसेच येथील तलावात आढळणारे लक्ष्मी नावाचे वैशिष्टय़पूर्ण कमळही आता इतिहासजमा झाले आहे. आता तानसा ते बारवीच्या जंगल क्षेत्रात गव्यांचा असलेला वावर वन्यजीव अभ्यासकांसाठी महत्त्वाचा असून हे क्षेत्र संरक्षित करण्याची मागणी करण्यात येत आहे.

बारवी जंगलातील आसपासच्या गावात मोठय़ा प्रमाणावर जैवविविधता असून तिचे रक्षण करणे गरजेचे आहे. मासले ग्रामपंचायतीने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी याबाबत ठराव संमत केला आहे. येथील शंभर हेक्टरचे क्षेत्र संवर्धित राखीव क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची गरज आहे.

सदानंद सोमण, सरपंच, मासले.

बारवीच्या जंगलात दिसणारा गवा चांगल्या खाद्याच्या शोधात फिरतो आहे. इथून पुढे तो तानसा अभयारण्य क्षेत्रात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्सुकतेपोटी त्याला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक, ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild gaur lived in murbad
Show comments