ठाणे : पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या येऊरच्या जंगलात यावर्षी होळी आणि धुलिवंदनानिमित्ताने पुन्हा एकदा जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्यांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनीक्षेपकावर नाचगाणी, पाण्याची नासाडी होणार आहेत. त्यासाठी एक हजार ते दोन हजार रुपयांचे तिकीट देखील आहे. मद्यपान देखील या हाॅटेलमध्ये होणार आहे. त्यामुळे प्राण्यांच्या या जंगलात हुल्लडबाजांच्या पार्टीला केव्हा आवर बसणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच, या जंगलातील मुख्य रस्त्यावर दोन बिबट्यांचा वावर आढळला होता. असे असतानाही पार्ट्या आयोजित केल्याने वन्य जीवांच्या अधिवासाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईमध्ये विस्तीर्ण पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा येऊर वन परिक्षेत्र हा पर्यावरणीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. या जंगलामध्ये बिबट्यांसह विविध प्राणी, पक्षी, कीटक आणि दुर्मिळ वनस्पती आढळते. असे असले तरी या जंगलामध्ये बेकायदा बांधकामे, हाॅटेल आणि टर्फ तयार झाले आहेत. त्यामुळे जंगलाचे लचके तुटले आहेत. रात्री उशीरापर्यंत सुरू असलेले विवाह समारंभ, त्यासाठी वापरण्यात आलेला प्रखर प्रकाशझोत यामुळे निशाचर प्राणी पक्षी यांच्यावर त्याचा परिणाम होतो. येथील गोगांटाविरोधात पर्यावरणवादी आणि गावकऱ्यांनी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर काही प्रमाणात येथील पार्ट्यांवर निर्बंध आली होती. परंतु आता पुन्हा या पार्ट्या सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

धुलिवंदनाच्या दिवशी काही हाॅटेल मालकांनी येथे पार्ट्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येऊरच्या रस्त्यांवर फलकबाजी समाजमाध्यमांवर जाहीरबाजी सुरू करण्यात आली आहे. या पार्ट्यांसाठी ध्वनी क्षेपक देखील वापरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या जंगलातून नागरिकांना वाहतुक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मुख्य मार्गिकेवर दोन बिबटे आढळून आले होते. या घटनेस अद्याप आठवडा देखील पूर्ण झालेला नाही. परंतु असे असतानाही या पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याने जंगलाचा वापर आता पार्ट्यांसाठी होत असल्याचे उघड झाले आहे.

यासंदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांना विचारले असता, त्यांनी तपासून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मयुर सुरवसे यांना विचारले असता, होळी निमित्ताने येऊरमध्ये गस्त घालण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येऊर वन परिक्षेत्र संवेदनशील आहे. असे असतानाही पार्ट्यांचे आयोजन होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच येऊरच्या मुख्य रस्त्यावर दोन बिबटे आढळून आले होते. महापालिकेकडे येथील हाॅटेलच्या अतिक्रमणा बाबतच्या अनेक तक्रारी आहेत. परंतु पुरेशी कारवाई होत नाही. येथे मद्य देखील विना परवाना विक्री केले जाते. निशांत बंगेरा, पर्यावरणवादी कार्यकर्ते.

Story img Loader