tvlogआपल्या आसपासच्या जंगलात आणि परिसरातसुद्धा अनेक रानटी वनस्पती पावसाळ्यात उगवलेल्या दिसतात. ज्या जागी काल-परवापर्यंत काहीही उगवलेलं नव्हतं त्या जागा पावसानंतर लगेचच हिरव्या झालेल्या दिसतात. त्यात काही हर्वज् असतात तशा वेलीही असतात. भिंतीतल्या दोन दगडांच्या सांध्रीमधल्या मातीतून डोकावणारे नेचेसुद्धा खूप लोभस दिसतात. एरवी बिनफुलांच्या या नेच्यांकडे आपले फारसे लक्ष जात नाही. कधी कधी या जुन्या भिंती पाडल्या जातात आणि नेचे गायब होतात. कधी कधी या भिंतीची  डागडुजी केली जाते तेव्हा दोन दगडांमध्ये सिमेंट भरले जाते, तेव्हा सिमेंटने भरलेला भाग बिननेचाचा दिसतो, मात्र ज्या सांध्रींमध्ये माती अजून शिल्लक आहे असा भाग नेच्यांनी भरगच्च झालेला दिसतो. या काँक्रीटीकरणात पावसाळ्यानंतर उगवणारे हे छोटे छोटे सौंदर्याचे तुकडे दिवसागणिक हरवून जात आहेत.
आपले हे रानात उगवणारे भाऊबंद निसर्गातील विविध अपत्यांना तोंड देत असतात. मग ते दुष्काळामुळे पाण्याशिवाय जगणे असो वा अतिवृष्टीमुळे होणारा त्रास असो. रोगांचे हल्लेही होतात आणि कीटकांचे आक्रमणही होत असते. हवामान, तापमान यांमध्ये होणारे बदल, वादळवारे, ऊन या सगळ्याशी झुंजत ही रानातील झाडे आणि इतर जीवसुद्धा स्वत: जगत असतात आणि वंशसातत्य कायम राखत असतात. त्यांच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याचे नैसर्गिक सामथ्र्य निर्माण झालेले असते. त्यांना रानटी म्हणून सोडून देऊन चालणार नाही. कारण ते आपण रोज खातो त्या जेवणातले अन्नधान्य आणि फळे यांचे रानातील भाऊबंद आहेत. सध्या येऊरच्या जंगलात असाच एक रान द्राक्षांचा वेल फुललेला आहे.
द्राक्षाच्या घोसाचा स्वत:चा म्हणून एक खास आकार असतो. एक मोठा जाड देठ, त्याला लगडलेली छोटय़ा देठांसकट अनेक द्राक्षे. ती लटकतानापण वरच्या बाजूस जास्त तर खाली हळूहळू कमी होत जाणारी. निमुळता होत जाणारा थोडय़ाफार फरकाने शंकूसारखा आकार. अशा आकारातले हिरव्या आणि लाल मण्यांचे, रानद्राक्षांच्या कळ्या फुलांचे फुटाफुटाच्या अंतरावर लागलेले घोस घेऊन चढणाऱ्या या वेलाचा बुंधा अगदी नाजूक, थोडय़ाशा आमसुली रंगाचा असतो. पानाला पाच लोब किंवा टोके असतात. एक आड एक असणारी पाने जेवढी लांब असतात तेवढीच रुंद असतात. मात्र या पानांच्या कडा मात्र दंतूर. पाच मीटरची उंची गाठणाऱ्या या वेलाच्या बुंद्धय़ाच्या ज्या बाजूला पान आलेलं असतं त्याच्या अगदी विरुद्ध बाजूस स्प्रिंगसारखा दिसणारा तण आलेला असतो. या तणाच्या टोकाला दोन फाटे फुटतात आणि वेल दुसऱ्या झाडाचा आधार घेऊन वर चढत राहातो.
खरंतर, पानाच्या विरुद्ध बाजूला तण असणं हेच द्राक्षाच्या कुळाचं खास वैशिष्टय़ आहे. या रान द्राक्षांच्या सौंदर्यात अधिकच भर टाकतात ते म्हणजे त्यावरचे दवबिंदू. लाल मण्यासारख्या दिसणाऱ्या मण्यातून बाहेर आलेले इवले इवले पिवळ्या रंगाचे पुंकेसर, त्यावर पडलेले दवबिंदू, दवबिंदूतून आरपार जाणारी सूर्यकिरणे आणि या किरणांमुळे दवबिंदूंना प्राप्त झालेली चमक या सर्व गोष्टी डोळ्यांचं अगदी पारणं फेडणाऱ्या आहेत. या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हातच येऊरच्या जंगलात एखादा तरी फेरफटका मारला पाहिजे.
संपर्क- ९८२०१०१८६९.

Story img Loader