काकोळे तलावाच्या वाटेवर निसर्गसौंदर्याची उधळण
अर्निबध नागरीकरण आणि बेशिस्त औद्योगीकरणामुळे ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमधील निसर्ग संपदेचा झपाटय़ाने ऱ्हास होत असला, तरी काही ठिकाणी अद्याप निसर्ग सौंदर्याच्या खुणा दिसून येतात. अंबरनाथच्या पूर्व विभागात काकोळे तलाव परिसरात सध्या फुलून आलेली निरनिराळी रानफुले त्याचीच साक्ष देत आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरत्या पावसाळ्याच्या दिवसात सातारा जिल्ह्य़ातील कास पठारावर फुलणारी रंगीबेरंगी रानफुले पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. मात्र ठाणे जिल्ह्य़ातही विविध ठिकाणी सरत्या पावसाळ्यात पठारांवर विविध प्रकारची फुले फुलतात. अंबरनाथचा काकोळे तलाव परिसर त्यापैकीच एक आहे.
अलीकडेच अंबरनाथ येथील मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेने काकोळे तलाव परिसरात निसर्ग भ्रमंती आयोजित केली होती. त्यात शहरातील पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते. या भ्रमंतीत आनंदनगर औद्योगिक वसाहतीजवळून काकोळे गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रानफुलांचे जणू संमेलनच भरल्याचे आढळून आले. काकोळे तलावाकडे जाणाऱ्या वाटेवर सध्या गुलाबी रंगाची घंटेच्या आकाराची रानतिळाची फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. याशिवाय रानभेंडी, लाजाळू, रुई, कुडा, बोरपुडी, सोनकुसुम, करटोली, गोधडी, सीतेची आसवं, उंदरी, गेंद आदी अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात. या वैविध्यपूर्ण निसर्ग संपदेची सविस्तर नोंद केली जात असल्याचे मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यकर्त्यां आणि रुईया महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मनीषा कर्पे यांनी सांगितले.
शासन सध्या शहरांमधील पर्यावरण राखण्यासाठी खास हरित पट्टे विकसित करण्यासाठी स्थानिक पालिकांना प्रोत्साहन देत आहे. या योजनेतून काकोळे तलाव परिसरातील निसर्ग संपदेचे जतन करता येईल, असेही कर्पे यांनी सांगितले.
वनसंवर्धनाची मागणी
अंबरनाथच्या पूर्वेकडील चिखलोली, काकोळे परिसराप्रमाणेच पश्चिमेकडे केंद्र शासनाचा आयुध निर्माणी कारखाना परिसर, जावसई, कोहोज-खुंटवलीच्या सीमांवरील डोंगर येथे वन विभागाची जागा मोठय़ा प्रमाणात आहे. सुदैवाने अद्याप तिथे फारसे अतिक्रमण झालेले नाही. त्यामुळे या जागा ताब्यात घेऊन तिथे वनराई फुलवावी, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत.