बदलापूर : इतर पक्षी प्राण्यांप्रमाणे आकर्षक नसल्याने आणि सर्वसामान्यांच्या नजरेत दुय्यम ठरलेल्या मृतभक्षी गिधाडाला तसा सन्मान कमीच मिळाला. नागरीकरणाच्या रेट्यात त्यांची संख्या झपाट्याने घटू लागली. नागरिकांचे बदललेले समज आणि इतर अनेक कारणांमुळे खाद्याला मुकलेल्या गिधाडांच्या संरक्षणासाठी आता वन्यजीवप्रेमी सरसावले आहेत. वन विभाग, वन्यजीव विभाग आणि प्राणी प्रेमी संघटनांच्या मदतीने नुकताच जागतिक गिधाड जनजागृती दिन साजरा करण्यात आला. नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या आसपासच्या गिधाडाच्या अधिवासाची माहिती देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
जगभरातील गिधाडांच्या विविध जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. गिधाडांचे खाद्यही कमी झाले आहे. वाघाच्या बाबतीत जितका आदर सर्वसामान्यांना असतो तितका आदर गिधाडांना नाही. मात्र गिधाडही वर्ग एक प्रकारातील संरक्षीत पक्षी आहे. तो मृतभक्षी प्राणी आहे. त्यामुळे पूर्वजांना गिधाडांची जाणीव होती. रोगराईपासून आळा बसण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याने त्याला महत्व होते. मात्र कालांतराने सर्वच ठिकाणाहून गिधाडे कमी झाली. ठाणे जिल्ह्यात माहुलीच्या डोंगरात, हाजीमलंग, सह्याद्रीच्या पूर्व रांगेत सिद्धगड, गणेशगडद, मुंब्र्याचे डोंगर येथे गिधाडे होती. 90 च्या दशकात यांची संख्या कमी होऊ लागली. घातक औषधे, आजार पसरल्याने त्यांची संख्या कमी झाल्याचे बोलले जाते.
आकर्षण असलेल्या पक्षांमध्ये गिधाड बसत नाही. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या गिधाडांची जिल्ह्यातील संख्या अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे गिधाडांच्या जाती संरक्षित होऊन त्या वाढाव्यात, त्यांची संख्या वाढावी आणि त्यासाठी त्यांना पोषक वातावरण मिळावे यासाठी नुकताच 3 सप्टेंबर रोजी जागतिक गिधाड जनजागृती दिन साजरा करण्यात आला. ठाणे जिल्हा वन विभाग, वन्यजीव विभाग, अश्वमेध प्रतिष्ठान, इंटॅक ठाणे, आउल कंझर्वेशन फाऊंडेशन, डब्लु डब्लु एफ यांच्या संयुक्त विद्यमाने मुरबाड आणि शहापूर तालुक्यात हे कार्यक्रम पार पडले.
हेही वाचा : डोंबिवली : नोकरीचे आमिष दाखवून डोंबिवलीत विद्यार्थीनीची फसवणूक
येथे निवृत्त वन अधिकारी अजय पिलारीसेठ, अर्जून म्हसे पाटील तर तानसा अभयारण्याचे वनक्षेत्रपाल रमेश रसाळ, मुरबाड पूर्वच्या वनक्षेत्रपाल दर्शना पाटील तसेच आसपासचे वनक्षेत्रपाल आणि संस्थांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी या प्राण्याबाबत, त्याच्या वैशिष्ट्यांबाबत चित्रफितीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तसेच चर्चाही करण्यात आली. सर्वसामान्यांमध्ये गिधाडाबाबत प्रबोधन व्हावे यासाठी यावेळी फलक प्रसिद्ध करण्यात आले. सर्वसामान्यांनी गिधाड दिसल्यास त्याची माहिती वन विभागाला द्यावी, जेणेकरून त्यांचा अधिवास माहिती होईल, असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.