लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : घोडबंदर मार्गावर वाहतुक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उड्डाणपूल उभारला जात आहे. या उड्डाणपूलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या दोन ते अडीच महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडबंदर भागातील भाईंदरपाडा, नागलाबंदर आणि गायमुख भागात होणाऱ्या कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. घोडबंदरपट्ट्यातील हा चौथा उड्डाणपूल ठरणार आहे.

घोडबंदर भागात कासारवडवलीपुढील भाईंदरपाडा, नागलाबंदर आणि गायमुख भागात नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या वाहनांचा भार घोडबंदर मार्गावर वाढला आहे. तसेच या मार्गावरून हजारो वाहने मिरा भाईंदर, वसई, बोरीवलीच्या दिशेने वाहतुक करत असतात. उरण येथील जेएनपीटी बंदर आणि भिवंडी भागातून हजारो जड अवजड वाहने घोडबंदर मार्गावरून गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा भार अधिक असतो. त्यातच मागील काही वर्षांपासून या भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) येथील मार्गिकांवर मार्गावरोधक बसविले आहेत. निर्माण कामामुळे येथील मार्गिका अत्यंत अरुंद झाल्या आहेत. त्याचा परिणाम दररोज येथून वाहतुक करणाऱ्या चालकांना सहन करावा लागत आहे.

येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएने भाईंदरपाडा परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. या उड्डाणपूलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून येत्या दोन ते अडीच महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या उड्डाणपूलाखालून भुयारी मार्गिका देखील उभारण्यात आली आहे. भुयारी मार्गिकेमुळे आता येथील वाहतुकीस देखील अडथळा होणार नसल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे.

घोडबंदर भागात मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ भागात उड्डाणपूल आहेत. या उड्डाणपूलांमुळे येथील वाहतुक कोंडीतून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भाईंदरपाडा येथील उड्डाणपूल कार्यान्वित झाल्यास तो घोडबंदर पट्ट्यातील चौथा उड्डाणपूल ठरणार आहे.

भाईंदरपाडा येथील उड्डाणपूल ६२० मीटर लांब असून प्रत्येकी दोन पदरी मार्गिका उड्डाणपूलावर आहे. सध्या उड्डाणपूलावरील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर रंगकाम आणि विद्युतीकरणाचे काम केले जाणार आहे. ही कामे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचा एका अधिकाऱ्याने दिली.