उल्हासनगरः पुनर्विकासातील मर्यादांमुळे आधीच अडचणीत असलेल्या उल्हासनगर शहरातील बांधकाम क्षेत्राला नव्याने वाढ करण्यात आलेल्या रेडी रेकनरच्या दरामुळे खीळ बसण्याची भीती व्यक्त होते आहे. उल्हासनगर शहरातील रेडी रेकनरच्या दरात तब्बल ९ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रातील ही सर्वाधिक वाढ आहे. तर राज्यातील सोलापुरनंतरही ही दुसरी वाढ आहे. त्यामुळे उल्हासनगरातून अंबरनाथ, कल्याणमध्ये वाढलेल्या विस्थापनाला गती येईल आणि शहराच्या विकासावर दूरगामी परिणाम होतील, अशी भीती बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

बहुतांश शासकीय भुखंडांवर वसलेल्या उल्हासनगर शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या काही वर्षात गंभीर झाला आहे. शासकीय जमिनीवरील भुखंडांचे भोगवटा शुल्क कमी करून १० टक्के करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला होता. तरी उल्हासनगर शहरात पुनर्विकासाला अद्याप म्हणावी तशी सुरूवात झालेली नाही. ज्या जमिनींचे सातबारे मालकीचे आहेत त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. पुनर्विकास होत नसल्याने व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगर शहरातील व्यापारी आणि स्थानिकांनी कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पलावा, पाले या भागात स्थलांतर होण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या बांधकाम क्षेत्रासाठी नव्याने जाहीर करण्यात आलेले रेडी रेकनरचे दर डोकेदुखी ठरण्याची भीती व्यक्त होते आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने १ एप्रिलपासून राज्यातील शहरनिहाय रेडी रेकनरचे दर जाहीर केले. यात महाराष्ट्रात सर्वाधिक दर सोलापूर शहरात वाढल्याचे समोर आले आहे. तर त्या पाठोपाठ उल्हासनगर शहरात तब्बल ९ टक्क्यांनी दरवाढ करण्यात आलेली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील ही सर्वाधिक दरवाढ आहे. या दरवाढीमुळे उल्हासनगर शहरातील नव्या घरांच्या किमती वाढण्याची भीती माजी नगरसेवक राजेश वधारिया यांनी व्यक्त केली आहे. यामुळे एन्क्झिलरी एफएसआय, प्रिमियम एफएसआय यांच्याही किमती वाढणार आहेत. परिणामी घरांचे दर वाढवावे लागतील. आधीच इथे असे प्रकल्प कमी असतात. त्यात दरवाढ केल्याने त्याचा शहराच्या विकासावर परिणाम होईल.

उल्हासनगरच्या विकासाला आधीच मर्यादा आहेत. इथे अनेक घरे रिकामी पडत आहेत. नागरिक कल्याण, अंबरनाथमध्ये स्थलांतरीत होत आहेत. असे असताना अशा निर्णयामुळे इथल्या बांधकाम क्षेत्राला फटका बसेल, अशी भीती बांधकाम व्यावसायिक आणि माजी नगरसेवक भरत गंगोत्री यांनी व्यक्त केली आहे. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे हे दर कमी करण्याची मागणी करू, असेही गंगोत्री म्हणाले.

रेडी रेकनरचे दर वाढल्याने घरांच्या किमती वाढणारे हे निश्चित आहे. आज आसपासच्या शहरांपेक्षा उल्हासनगरातील दर कमी आहेत. ते दर वाढू शकतात. पण सध्या इथल्या जमिनींची मालकी हाच सर्वात मोठा विषय आहे. – ललीत खोब्रागडे, सहाय्यक संचालक, नगररचना, उल्हासनगर महापालिका.

उल्हासनगर शहरात पाणी प्रश्न गंभीर आहे. जगातील सर्वाधिक दाटीवाटीचे शहर म्हणूनही उल्हासनगर परिचित आहे. वाहतूक कोंडी, प्रदुषण, वीजेचा प्रश्न शहरात कायम आहे. असे असताना धोकादायक इमारतींच्या छायेत रहिवासी असतात. अशात त्यांनी उल्हासनगर सोडून कल्याण, अंबरनाथला पसंती दिली आहे. त्यात आता घरांच्या किमती वाढल्यास शहर रिकामे होण्याची भीती आहे.