कल्याण – स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील जुन्या तलावांचा कायपालट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अमृत टप्पा दोन योजनेतून हे तलाव पुरुज्जीवित आणि सुशोभित करण्याच्या कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. या योजनेसाठी पालिकेने सुमारे २८ कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे, असे बांधकाम विभागातील एका वरिष्ठाने सांगितले.
पालिका हद्दीतील पाणीपुरवठा विभागातील जलकुंभ उभारणे, नवीन विस्तारित भागात जलवाहिन्या टाकणे या कामांसाठी अमृत टप्पा दोन योजनेतून अलीकडेच शासनाने सुमारे ३०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पानंतर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील तलावांचे पुनरुज्जीवन करुन त्यांचा कायापालट करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. कल्याण, डोंबिवली, २७ गावांमध्ये एकूण लहान, मोठे ४२ तलाव आहेत. यातील कल्याणमधील शहराच्या मध्यवर्ति ठिकाणच्या काळा तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. पर्यटन स्थळ म्हणून काळा तलावाकडे बघितले जाते. भटाळे तलाव बेकायदा बांधकामांच्या विळख्यात आहे. इतर तलाव बेकायदा बांधकामे करुन हडप करण्याचे प्रयत्न आहेत.
हेही वाचा – ठाणे महापालिका शाळांचे रूप बदलण्याची चिन्हे; २ सीबीएसई शाळा सुरू होणार
डोंबिवली, कल्याण शहरांच्या विविध भागात इतिहासकालीन अनेक तलाव आहेत. काही तलाव गावातील पाणवठा म्हणून ओळखले जात होते. शिळफाटा रस्त्यावरील निळजे गावातील तलाव, माऊली तलाव, कल्याणमधील उंबर्डे गावातील तलाव या तीन तलावांचे पुनरुज्जीवन आणि सुशोभिकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिकेकडे या कामांसाठी निधीची पुरेशी उपलब्धता नसल्याने शासनाच्या योजनेतून तलावांचा कायपालट करण्यात येणार आहे, असे बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
उंबर्डे गावातील तलावाचे क्षेत्रफळ २९ हजार ९१५ चौरस मीटर आहे. या तलावात २० ते ३० टक्के पाणी साठा असतो. या तलावातील पाण्याचा वापर उन्हाळ्यात परिसरातील ग्रामस्थ भाजीपाला लागवडीसाठी करतात. तलाव गाळाने भरलेला आहे. या तलावातील गाळ कायापालट करण्याच्यावेळी काढण्यात येईल, असे अधिकारी म्हणाला. शिळफाटा रस्त्यावरील निळजे तलावाचे क्षेत्रफळ ३७ हजार ५०० चौरस मीटर आहे. तलावाच्या चारही बाजूने संरक्षित भिंत आहे. हिवाळ्यात विविध प्रकारचे पक्षी याठिकाणी येतात. अनेक पक्षी निरीक्षक नियमित निळजे तलाव भागात पक्षी निरीक्षणासाठी येतात. तलावाच्या पाण्याचा वापर परिसरातील ग्रामस्थ वीटभट्टी, भाजीपाला लागवडीसाठी करतात. या तलावातील पाण्याचा बेसुमार उपसा केला जात नसल्याने तलाव बारही पाण्याने भरलेला असतो. डोंबिवली परिसरातील अनेक शाळा चालक विद्यार्थ्यांच्या सहली निळजे तलाव ठिकाणी आणून विद्यार्थ्यांना जैवविविधतेचे प्रात्यक्षिक धडे देतात.
निळजे, माऊल तलावांचा कायापालट करण्यासाठी १५ कोटी ७८ लाख, उंबर्डे तलावाच्या सुशोभिकरण्यासाठी १२ कोटी ९१ लाख रुपयांचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. या प्रस्तावांना शासनाच्या आवश्यक तांत्रिक, वित्तीय मंजुरी मिळाल्यानंतर, निधीची उपलब्ध झाल्यानंतर ही कामे हाती घेतली जातील, असे बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रस्तावा व्यतिरिक्त पालिकेने डोंबिवली शहराच्या विविध भागातील मलनिस्सारण वाहिन्या भूमिगत टाकण्यासाठी अमृत टप्पा दोन योजनेतून १६० कोटींचा प्रस्ताव करण्यात आला आहे.