ठाणे : ठाणे ते बोरिवलीचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी भुयारी मार्गाची तर, वाहतूक कोंडीग्रस्त घोडबंदर मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख खाडी किनारी मार्ग उभारण्यात येत आहे. भुयारी मार्गामुळे घोडबंदर तसेच ठाणे शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढून कोंडी वाढण्याची येण्याची शक्यता वर्तविली जात असून या पार्श्वभूमीवर हे दोन्ही मार्ग उन्नत मार्गाने जोडण्याचे नियोजन असल्याचा उल्लेख यंदाच्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
ठाणे शहरातील अनेक नागरिकांची कार्यालये मुंबई शहरात आहेत. ज्या नागरिकांची कार्यालये मुंबई उपनगरात आहेत, ते नागरिक दररोज बस किंवा स्वत:च्या वाहनाने घोडबंदर, फाऊंटन मार्गे प्रवास करतात. बोरिवली भागात कामाला असलेल्या नागरिकांना दररोज २३ किलोमीटर इतका प्रवास करावा लागतो. यामुळे घर ते कार्यालय या प्रवासात त्यांचा बराच वेळ खर्ची पडतो. या मार्गावर अनेकदा कोंडी होते. यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया जाते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग उभारणीचा निर्णय घेऊन त्याचे कामही एमएमआरडीएमार्फत सुरू केले आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर १० ते १५ मिनीटात पार करणे शक्य होणार आहे. याशिवाय, घोडबंदर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी बाळकुम ते गायमुख असा खाडीकिनारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. सुमारे १३ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून तो शहराबाहेरून जाणार आहे. यामुळे शहरातील कोंडीची समस्या सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी, या भुयारी मार्गाची मार्गिका घोडबंदर रस्त्याला ब्रह्मांड नाका येथे जोडण्यात येणार आहे. यामुळे भुयारी मार्गावरील वाहनांचा ताण घोडबंदर मार्गावर वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत मार्गांवर होऊन कोंडी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेने आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे प्रस्ताव
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग आणि बाळकुम ते गायमुख खाडी किनारी मार्ग हे दोन्ही मार्ग उन्नत मार्गाने जोडण्याचे नियोजन पालिकेकडून आखले जात असून तशी माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दोन दिवसांपुर्वी अर्थसंकल्प सादर करताना दिली. याशिवाय, अर्थसंकल्पात तसा उल्लेखही करण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली भुयारी मार्गे बोरिवलीवरून येणारी वाहतूक ही ठाणे शहरातून गेल्यास अनेक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग आणि बाळकुम ते गायमुख खाडी किनारी मार्ग हे दोन्ही मार्ग उन्नत मार्गाने जोडून बोरिवलीवरून येणारी वाहतूक थेट उन्नत मार्गे खाडीकिनारी मार्गे सोडण्याचे नियोजन आखले जात आहे.