बदलापूर : लोकसभा निवडणुकीत कुणी काय केलं हे माझ्यासाठी गौण आहे. मी भाजपसाठी काम करणार. पक्षाने विद्यमान आमदारांना तिकीट दिले तर त्या आमदारांचेही काम करणार, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
कपिल पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांनी नरमाईचा सूर लावल्याची चर्चा रंगली आहे. नुकत्याच ठाण्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात कपिल पाटील बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी भाषणात सुरुवातीला उपस्थितांमध्ये किसन कथोरे पाटील यांच्या अगदी मागेच बसले असतानाही त्यांनी कथोरे यांचे नाव घेण्याचे टाळले. त्याचवेळी, ‘ ज्यांचे नाव राहिले त्यांची नावं राहिली, मी आता उमेदवार नाही त्यामुळे मला फरक पडत नाही’, असा टोलाही पाटील यांनी सुरुवातीलाच लगावला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला. या पराभावाला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे जबाबदार असल्याचा दावा करत पाटील यांनी वेळोवेळी कथोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यामुळे कथोरे आणि पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून विस्तवही जात नाही. त्यात भाजप किंवा महायुतीच्या विविध कार्यक्रमांना दोघेही एकमेकांच्या उपस्थितीत येण्याचे टाळतात. मात्र बुधवारी ठाण्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात आमदार किसन कथोरे आणि माजी मंत्री कपिल पाटील एकाच मंचावर आले. यावेळी कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवरून जोरदार टोलेबाजी केली.
महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित असताना विविध नेत्यांनी केलेल्या भाषणात वारंवार महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले जात होते. त्यावरही पाटील यांनी टोला लगावला. सव्वा दोन वर्षे झाल्यानंतरही आपल्याला एकत्र काम केले पाहिजे हे का सांगावे लागते, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. मेळावा घेण्यापेक्षा महायुती मधील ज्यांच्या तोंडाला बघून मते मिळतात अशा सर्वांची तोंड एका दिशेला करा, असे आवाहन त्यांनी वरिष्ठांना केले. विशेष म्हणजे भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांची नावे घेतली. त्याचवेळी आमदार किसन कथोरे यांचे नाव घेण्याचे मात्र त्यांनी टाळले. इतकेच नाही तर ज्यांची नावं राहिली त्याचा दोष मला देऊ नका. काही नावं राहिली तरी मला फरक पडत नाही. कारण मी निवडणुकीत उभा नाही, असे पाटील म्हणाले. त्यामुळे आगामी भाषणात मुरबाड विधानसभा मतदारसंघ आणि किसन कथोरे यांच्या बद्दल पाटील काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आणखी वाचा-Ajit Pawar : ठाण्यात अजित पवार गटाकडून जितेंद्र आव्हाडांना पुन्हा धक्का
मात्र पक्षाने विद्यमान आमदारांना तिकीट दिले तर पक्षासाठी विद्यमान आमदारांचे काम करणार, असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. मागे कुणी काय केलं हे माझ्यासाठी गौण आहे. मी भाजपसाठी काम करणार आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळे येथे विधानसभा निवडणुकीत मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी कपिल पाटील उतरणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तसेच परिस्थिती सकारात्मक असताना पराभवामुळे जे भोगावे लागते ते इतरांच्या वाटायला नको. त्यामुळे कुणाशी जमो अथवा ना जमो पण महायुतीच्या कामासाठी एकजुटीने पुढे या, असे आवाहन पाटी यांनी यावेळी बोलताना केले.
मुख्यमंत्री पदासाठी एकमेकांचे उमेदवार पाडू नका
महाराष्ट्र सध्या मुख्यमंत्री कोण होणार हे महत्त्वाचे नाही. प्रत्येक जण आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असा दावा करतो. मात्र आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी एकमेकांची संख्या कमी करू नका, असे सांगत एकमेकांच्या उमेदवारांना पाडू नका असे जाहीर आवाहनही कपिल पाटील यांनी यावेळी केले.
मतदारसंघाची मागणी रोखा
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार असतानाही अन्य मित्र पक्षाचे पदाधिकारी त्या मतदारसंघाची मागणी करताना दिसत आहेत. यावरही कपिल पाटील यांनी अशा पदाधिकाऱ्यांना टोला लगावला. काही पदाधिकाऱ्यांच्या अशा मागण्यांमुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण होतात. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे वरिष्ठांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात. कुणीही उठतो आणि पत्रकार परिषद घेतो, असे सांगत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुरबाड, शहापूर, कल्याण पूर्व, पश्चिममध्ये सुरू असलेल्या मतदारसंघांच्या मागणी प्रकरावर टीका केली.