|| किन्नरी जाधव
डिसेंबर अखेर प्रकल्प पूर्ण; पर्यटकांसाठी चुलीवरील खाद्यपदार्थ; शेणा-मातीने सारवलेल्या घरात वास्तव्य
हिवाळी पर्यटनासाठी मुख्य शहरापासून लांब अंतरावर माळशेजच्या पायथ्याशी असणाऱ्या थितबी गावात पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली असून डिसेंबर अखेपर्यंत या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने पर्यटकांना साहसी खेळाचा थरारही अनुभवता येणार आहे.
वनविभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या पुढाकाराने होत असलेल्या या प्रकल्पामुळे यंदाच्या हिवाळी पर्यटनात विविध खेळ आणि ग्रामीण पर्यटनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. या खेळांबरोबरच शहरी वातावरणात वाढलेल्या पर्यटकांना खेडय़ातील जगण्याचा अनुभव देण्यासाठी थितबी गावातील आदिवासींच्या शेणा-मातीने सावरलेल्या घरात वास्तव्य करता येणार असून गावाकडच्या चुलीवरील खाद्यपदार्थ पर्यटकांना चाखता येणार आहेत. या पर्यटन ग्राम प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून शहरातील पाहुण्यांच्या स्वागतासाठी थितबीतील गावकरी सज्ज झाले आहेत.
वनविभाग आणि जिल्हा नियोजन समितीकडून एकत्रित तयार करण्यात आलेल्या या पर्यटन ग्राम प्रकल्पाकडे अनेकांचा ओढा असतो. माळशेजच्या पायथ्याशी असलेल्या या गावाला लाभलेले निसर्ग सौंदर्य, शांतता पर्यटकांना खुणावत असते. या प्रकल्पामुळे पर्यटकांना सुरक्षितरीत्या माळशेजच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येत आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटकांच्या निवासासाठी स्वतंत्र कक्ष, सामूहिक कक्ष, सभा-संमेलनांसाठी सभागृह, तंबूनिवास आणि स्वयंपाकघराची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसराला लाभलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे शनिवार आणि रविवारी येथे पर्यटकांचा ओढा असतो. गावात निवांत राहण्यासाठी वनविभागातर्फे सुविधा असल्या तरी पर्यटनासाठी कोणतेही माध्यम नव्हते. यासाठी गेल्या वर्षी वनविभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीने पर्यटकांच्या मूलभूत सुविधेबरोबरच साहसी खेळांचा पर्याय उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यंदाच्या हिवाळी पर्यटनासाठी हे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर अखेपर्यंत पर्यटकांना या साहसी खेळांचा अनुभव घेता येणार असल्याची माहिती ठाणे वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
या पर्यटन ग्राम प्रकल्पासाठी दोन कोटींचा खर्च करण्यात आला असून साहसी खेळांसाठी ५० लाखाचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरी वातावरणात वाढलेल्या अनेकांना खेडय़ाच्या जगण्याविषयी उत्सुकता असते. यासाठी थितबी गावातीलच काही आदिवासी नागरिकांच्या शेणा-मातीच्या घरात पर्यटकांना वास्तव्याची सुविधा करण्यात आली आहे. या खेडय़ातील गावकऱ्यांच्या चुलीवरील वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद पर्यटकांना या हिवाळी पर्यटनामुळे घेता येणार आहे. या निमित्ताने गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असून साहसी खेळाच्या नियोजनाची जबाबदारीही वनविभागाने या गावकऱ्यांकडे सोपवली आहे. यासाठी नॅशनल अॅकॅडमी ऑफ माऊंटेनीअरिंग संस्थेतर्फे साहसी खेळांचे रीतसर प्रशिक्षण गावकऱ्यांना दिले आहे.
या प्रकल्पामुळे गावातील नागरिकांना १५ हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न उपलब्ध होणार आहे. हिवाळी पर्यटनाच्या हेतूने प्रकल्पाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण केले जाईल. – राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी