कल्याण : घर खरेदीसाठी कर्ज घ्यायचे आहे म्हणून मध्यस्थांच्या माध्यमातून कर्जदारांची बनावट कागदपत्र तयार केली. ही कागदपत्रे खरी आहेत असे मध्यस्थांनी काॅसमाॅस बँकेच्या कल्याण शाखेतील अधिकाऱ्यांना सांगून २५ कर्जदारांसाठी एकूण सहा कोटी १२ लाख ६२ हजार रुपयांची कर्ज मंजूर करुन घेऊन बँकेची फसवणूक केली.
२०२१ मध्ये ही कर्जप्रकरणे काॅसमाॅस बँकेच्या कल्याण शाखेतून मंजूर करण्यात आली आहेत. या फसवणूक प्रकरणी बँकेचे पुणे येथील वसुली विभागाचे साहाय्यक महाव्यवस्थापक शरद बेदाडे (५७) यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी कर्ज मंजुरीतील मध्यस्थ शैलेश ताकभाते, सचिन पाटील, इस्माईल शेख, योगेंद्र जालंद्र, विनोद यादव, दत्ता आव्हाड, २५ कर्जदार, कागदपत्र छाननी करणारी मे. क्रक्स रिस्क मेॅनेजमेंट कंपनी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सत्या लाईफ स्टाईल्स, मे. एल. एक्स. एम. आय. इन्फ्रा, मे. आर्यन्स असोसिएट, मे. एस. आर. के . रिअल हाईट्स या गृहप्रकल्पांतील घरांसाठी २५ जणांनी २३ लाख ते २५ लाखाच्या दऱम्यान कर्ज घेतले होते.
हेही वाचा… ठाणे कोंडले; साकेत, खारेगाव खाडी पूलाच्या दुरुस्ती कामांचा परिणाम
पोलिसांनी सांगितले, आरोपी हे नेहमी घर खरेदीसाठी कर्ज घेणाऱ्यांची प्रकरणे बँकेत मंजुरीसाठी घेऊन येतात. त्यांनी आणलेल्या प्रकरणांची पडताळणी काॅसमाॅस बँकेतील शाखा व्यवस्थापक अमोल देशपांडे, साहाय्यक व्यवस्थापक नितीन कदम करत होते. आरोपी हे नियमित बँकेत कर्ज प्रकरणांसाठी येत असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. दोन वर्षापूर्वी आरोपींनी २६ कर्जदारांच्या घर खरेदीच्या नस्ती काॅसमाॅस बँकेत मंजुरीसाठी आणल्या.
हेही वाचा… घोडबंदरमधील आणखी २२ गृहसंकुलांना पाणी टंचाईच्या झळा
कर्ज प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बँकेने मे. क्रक्स रिस्क मॅनेजमेंट ही तृतीय पक्ष कंपनी नेमली. कर्जदारांनी दिलेली आर्थिक, वेतन चिठ्ठी, प्राप्तिकर विभागाशी संबंधित, त्यांचे नोकरीचे कार्यालय, पत्ते यांची खात्री करण्याची जबाबदारी या कंपनीची होती. या कंपनीने कर्जदारांचा पडताळणी अहवाल सुयोग्य असल्याचा अहवाल बँकेस दिल्यावर बँकेने २६ कर्जदारांना सहा कोटीहून अधिक रकमेची कर्जे मंजूर केली. कर्ज मंजुर होऊन विकासक घराचा ताबा देत नाही म्हणून एक कर्जदार नितीन धस यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. या प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. त्यावेळी मध्यस्थ ताकभाते आणि सहकाऱ्यांनी कर्जदारांची बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उघड झाले.
काॅसमाॅस बँकेने स्थानिक कर्मचाऱ्यांची तपास पथके तयार करुन २५ कर्जदारांच्या कर्जाऊ कागदपत्रांची छाननी, पडताळणी केली. त्यात अनेक खोट्या नोंदी, बनावट कागदपत्र आढळून आली. विकासकाने कर्जदारांसोबत केलेले घर खरेदीचे करार अधिक रकमेचे होते. प्रत्यक्षात तीच घरे विकासकाने इतरांना कमी किमतीत विकल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. घस्ते तपास करत आहेत.
कर्जदारांची यादी
विवेक चौधरी, नितीन धस, सिध्दी गोताड, मोहम्मद शेख, गितांजली मोरवेकर, मंथन परब, माधव पाटील, अनिलकुमार पासी, बिक्रम कांदेल, राहुल सूर्यवंशी, संतोष मलेकरी, अब्बास जहीर, गणेश गोताड, अझिझुलहसन दुरेशाहवर, यास्मिन आसिफ, ज्योती हिंदाळकर, ऋतिक सुर्वे, शंकर मद्दलसुमित्रा, आदील खान, रुखसार सय्यद, य बोदर, अमित मेस्त्री, धिरेंद्र सरोज. जेम्स डिमेलो, मोहम्मद कुरेशी.