लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस पुलावर तुळई बसविण्याचे काम पुर्ण झाल्याने येथील रस्ता शुक्रवार सकाळपासून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा रस्ता बंद असल्याने गेली २८ दिवस प्रवाशांना दररोज दीड किलोमीटरपर्यंत पायपीट करून स्थानक गाठावे लागत होते. आता हा रस्ता वाहतूकीसाठी खुला झाल्याने प्रवाशांची पायपीट बंद झाली आहे.

ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी हा पुल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपूलाच्या सिद्धार्थनगर ते विराज टॉवर दरम्यानच्या खांबांवर तुळई बसविण्याचे काम २६ जुलै रोजी हाती घेण्यात आले होता. या कामासाठी महिनाभराचा कालावधी लागणार होता. या कामादरम्यान कोणताही अपघात होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी हा रस्ता २४ ऑगस्टपर्यंत वाहतूकीसाठी बंद केला होता. या मार्गावरून ठाणे परिवहन सेवेच्या बोरिवली, नालासोपारा आणि रामनगर मार्गे वागळे आगार या बसगाड्या वाहतूक करतात. वाहतूक बदलामुळे या बसगाड्या ठाणे पूर्वऐवजी पश्चिम स्थानाकातून सोडण्यात येत होत्या. तसेच विविध कंपनीच्या तसेच खासगी बसगाड्यांना कोपरी बारा बंगला सर्कलपर्यंत वाहतूकीस मुभा होती. यामुळे प्रवाशांना दररोज दीड किलोमीटरपर्यंत पायपीट करून स्थानक गाठावे लागत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

आणखी वाचा-ठाणे पालिका शाळेच्या दुरुस्ती कामातील संथगतीमुळे अभियंते अडचणीत; ३४ पैकी फक्त ५ शाळांची कामे पुर्ण

रिक्षा तसेच कार अशा वाहनांची वाहतूक मंगला हायस्कूल, जुने कोपरी पोलिस ठाणे, कन्हैयानगर आणि ठाणेकरवाडी या मार्गे स्थानकाच्या दिशेने सुरू होती. रिक्षा चालक प्रती प्रवासी १० रुपये आकारत होते. अनेकांना हे रिक्षाभाडे परवडत नसल्याने प्रवासी पायी जाण्याला प्राधान्य देत होते. महिला प्रवाशांचे पायी जाताना सर्वाधिक हाल होत होते. अनेकदा स्थानकात उशीराने पोहचल्यास रेल्वेगाडीही निघून जाते आणि कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होतो. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. दरम्यान, सॅटीस पुलावर तुळई बसविण्याचे काम पुर्ण झाल्याने येथील रस्ता शुक्रवार सकाळपासून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची पायपीट बंद झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With the completion of beam work the road till kopri station is open for traffic mrj
Show comments