कल्याण : कल्याण पूर्वेतील शक्तिधाम या कल्याण डोंबिवली पालिका नियंत्रित रुग्णालयात शुक्रवारी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दोषी डाॅक्टरवर कारवाईची मागणी केली.
तर, पालिकेच्या वैद्यकीय विभागाने कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळुन लावले आहेत. या महिलेला अन्य रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाल्याचे पालिका डाॅक्टरांनी स्पष्ट केले आहे. शांती देवी मौर्या (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. ती कुटुंबीयांसह कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात राहत होती. पोटात दुखत असल्याने शांती देवी यांना शुक्रवारी तिच्या पतीने पालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तिधाम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिच्यावर गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. कुटुंंबीय मात्र तिला मुतखड्याचा त्रास होत असल्याचे सांगत होते.
दाखल करताना तिची प्रकृती ठीक नव्हती. तिला रक्त चढविण्यात आले होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने डाॅक्टरांनी सोमवारी दुपारी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. तिला भूल देण्याची प्रक्रिया पार पाडल्यावर तिची प्रकृती अधिकच खालावली. डाॅक्टरांच्या सल्ल्याने तिला कुटुंबीयांनी जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाटेतच तिचा मृत्यू झाला. या प्रकाराला पालिका रुग्णालयातील डाॅक्टर जबाबदार असल्याचा आरोप मयत महिलेचा पती अखिलेश मौर्या यांनी केला.
शक्तिधाम प्रसूतीगृहात मुतखड्याची शस्त्रक्रिया होत नाही. या कारणासाठी येथे दाखल करण्याचा प्रश्नच नाही. शांती देवी कुटुंंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आल्या होत्या. या कारणासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले होते, असे पालिका डाॅक्टरांनी सांंगितले. पालिका आशा कामगार यांंना सर्वेक्षण करत असताना शांती देवी यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांना पालिका रुग्णालयात जाण्याचा सल्ला आशा वर्कर यांनी दिला होता, असे डाॅक्टरांनी स्पष्ट केले.
शांती देवी या महिलेला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी शक्तिधाम पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. अचानक या महिलेची प्रकृती खालावत गेली आणि तिला अन्य रुग्णालयात डाॅक्टर हलविण्याचा विचार करत होते, त्याच दरम्यान तिचा मृत्यू झाला. पालिका रुग्णालयात अति दक्षता विभाग (आयसीयु) विभाग नसला तरी प्राप्त परिस्थितीप्रमाणे आपण तशी व्यवस्था रुग्णांसाठी करतो. – डाॅ. दीपा शुक्ला, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण डोंबिवली पालिका.