डोंबिवली : डोंबिवली जवळील ठाकुर्ली भागात सखाराम सोसायटीच्या परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये राहत असलेल्या एकाच कुटुंबातील एका महिलेचा दीड लाखाहून अधिक किमतीचा सोन्याचा ऐवज घरातील पती, सासऱ्याने चोरला असल्याची तक्रार महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे.आतापर्यंत सासु, सुनांमध्ये अशाप्रकारचे वाद होत होते. आता एका महिलेने आपल्या पती आणि सासऱ्या विरुध्द घरातील कपाटातील सोन्याचे ऐवज चोरले असल्याचा आरोप केल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. मागील वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. चोरीमध्ये ५४ हजार रूपयांचा सोन्याचा हार आणि ९९ हजार रूपयांचा सोन्याचा राणी हाराचा समावेश असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार आणि गुन्हा दाखल व्यक्ति एकाच कुटुंबात राहतात. रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत या महिलेने म्हटले आहे, की मागील वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत घरातील कपाटातील तिजोरीत सोन्याचा हार, राणी हार ठेवले होते. हे दागिने घालण्याची वेळ आली तेव्हा आपण कपाटातील सोन्याचे दागिने पाहिले तर ते दागिने तेथे नव्हते. याऊलट त्या तिजोरीत मूळ सोन्याच्या दागिन्यांसारखेच नकली सोन्याचे दागिने ठेवण्यात आले होते. घरात कोणीही बाहेरील व्यक्ती आलेली नाही. घरात कधी चोरी झाली नाही, तरी घरातील कपाटातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने महिलेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
तिने पती, सासरे यांच्याकडे विचारणा केली. कोणीही या दागिन्यांना हात लावला नसल्याचे त्यांनी सांगितले. घरात चोरी झाली नसताना, बाहेरील कोणीही व्यक्ति कधी घरात आलेला नसताना कपाटाच्या तिजोरीतील दागिन्यांची चोरी झाली. तेथे मूळ दागिन्यांसारखेच नकली सोन्याचे दागिने ठेवण्याचा प्रकार केला आहे. हा प्रकार अन्य कोणीही न करता घरातील पती आणि सासऱ्यानेच संगनमताने केला असण्याचा संशय व्यक्त करत महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून महिलेच्या तक्रारीवरून पती, सासऱ्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचा सासरा डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर भागात राहतो.याप्रकरणाचा तपास रामनगर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमिला कावळे तपास करत आहेत. घरात पती, सासऱ्यानेच महिलेच्या स्त्रीधनाची सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याने ठाकुर्ली परिसरात याविषयीची चर्चा सुरू झाली आहे.