डोंबिवली: येथील पूर्व रेल्वे स्थानक भागात मोबाईल विक्री दुकानातील अधिकृत संकेतांक वापरुन, ग्राहकांच्या कागदपत्रांचा वापर करुन ग्राहकांना बनावट आधारकार्डच्या आधारे नियमबाह्य सीमकार्ड विक्री करणाऱ्या हर्षदा पराडकर या महिलेला साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या विशेष पथकाने रविवारी अटक केली.
साहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे यांना डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात छत्री लावून सीमकार्ड विक्री प्रकरणात घोटाळा होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. कुराडे यांच्या विशेष पथकाने या सीमकार्ड विक्रेत्यांवर पाळत ठेऊन रविवारी महिलेला अटक केली.
हेही वाचा >>>ठाण्यातील भाजपा-शिंदे गट वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जम्मू-काश्मीरमधून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
डोंबिवलीतील गणेश इलेक्ट्राॅनिक्स शाॅप दुकानातील विक्री गुप्त संकेतांक वापरुन हर्षदा पराडकर ही महिला डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात सीमकार्ड विक्री करत होती. या मंचकावर सीमकार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आधारकार्डवरील छायाचित्रे काढून त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकाप्रमाणे छबी लावून सीमकार्ड विक्री केली जात होती. या विक्रीसाठी अधिकचा दर ही महिला आकारत होती. झटपट सीमकार्ड मिळत असल्याने ही सीमकार्ड खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल होता.
हेही वाचा >>>संजीव नाईकांचा स्वप्न भंग ?
पोलिसांनी या महिलेच्या मंचकावर छापा मारला. तिने १७० ग्राहकांना बनावट पध्दतीने सीमकार्ड विकल्याची कबुली दिली. या महिलेने आतापर्यंत किती सीमकार्ड विकली याचा तपास पोलीस करत आहेत. नियमबाह्य पध्दतीने सीमकार्ड विकल्याची माहिती टेली कम्युनिकेशन गारमेंट ऑफ इंडियाकडून पोलिसांना मिळाली आहे. त्याप्रमाणे ही छापेमारी केली केली जात आहे. ग्राहकांनी अधिकृत दुकानातून सीमकार्ड खरेदी करावी, असे आवाहन साहाय्यक आयुक्त कुराडे यांनी केले आहे.