लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील डी मार्ट मध्ये सामान खरेदीसाठी आलेल्या एका ४५ वर्षाच्या महिलेने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून अंगावरील कपड्यांमध्ये २२ हजार रुपयाहून अधिक किमतीचा माल चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित महिलेला पोलिसांच्या मदतीने तात्काळ अटक करण्यात आली.
मंगळवारी रात्री साडे दहा वाजता हा प्रकार घडला. सरबजीत कौर पदम (४५) असे आरोपी महिलेचा नाव आहे. ती कल्याण पूर्वेतील केशवपाडा झोपडपट्टी भागात राहते, असे पोलिसांनी सांगितले. डी मार्टमधील व्यवस्थापक शंकर गवळी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सरबजीत विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा… डोंबिवलीतील ६९ बेशिस्त रिक्षा चालकांचे परवाने रद्द होणार? चालकांनी थकवली ११ लाखाची दंडाची रक्कम
पोलिसांनी सांगितले, मानपाडा रस्त्यावरील डी मार्ट मध्ये मंगळवारी रात्री एक महिला सामान खरेदीसाठी आली होती. ही महिला सामान खरेदी करण्याच्या बहाण्याने काही वस्तू अंगावरील कपड्यांमध्ये लपवित आहे, असे व्यापारी संकुलातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांना दिसत होते. कर्मचाऱ्यांनी या महिलेवर लक्ष ठेवले. त्यावेळी ती सामान खरेदीच्या नावाने वस्तूंची चोरी करत आहे असे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही बाब तात्काळ डी मार्टचे व्यवस्थापक शंकर गवळी, महिला सुरक्षा रक्षक संपदा मोरे यांच्या निदर्शनास आणण्यात आली.
हेही वाचा… कळव्यातील बेकायदा बांधकामांवर पालिकेचा हातोडा
या महिलेला व्यापारी संकुलात महिला सुरक्षा रक्षक संपदा मोरे यांनी दुकानातील वस्तू घेण्यापासून रोखले आणि तिला एका खोलीत नेऊन तिची अंगझडती घेतली. त्यावेळी तिच्या अंगावरील कपड्यांमध्ये दुकानातील अनेक महागड्या वस्तू आढळून आल्या. दुकानातून या वस्तू चोरल्या असल्याची कबुली आरोपी महिलेने दिली. महिला सुरक्षा रक्षक मोरे आणि व्यवस्थापक गवळी यांनी चोरट्या महिलेला मानपाडा पोलीस ठाण्यात नेले. तिच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी या महिले विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.