लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : आपण पोलीस अधिकारी आहोत, असे एका तरूणीला सांगून तिला लग्नाचे आमिष दाखवून तरूणीकडून साखरपुड्याच्या नावाने आणि इतर कारणांनी रोख रक्कम असा एकूण ७० हजार रूपयांचा ऐवज उकळणाऱ्या ठाण्यातील एका तोतया पोलीस अधिकाऱ्या विरुध्द तरूणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली आहे. गेल्या महिनाभरात हा प्रकार घडला आहे.
३२ वर्षाचा तोतया पोलीस अधिकारी ठाण्यातील कॅडबरी जंक्शन भागात राहतो. पीडित तरूणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहते. पीडित ३० वर्षाची तरूणी कल्याण रेल्वे स्थानक भागातील एका व्यापारी संकुलातील कार्यालयात नोकरी करते.
पीडित तरूणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपली ठाण्यातील एका व्यक्ति बरोबर ओळख झाली होती. या व्यक्तिने आपण मुंबई पोलीस दलातील कुलाबा गु्न्हे शाखेच्या कार्यालयात साहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले होते. तरूणी अपेक्षित वराच्या प्रतिक्षेत होती. आपण तोतया पोलीस अधिकारी आहोत असे इसमाने तरूणीला दाखवून दिले नाही. हा इसम तरुणीच्या कार्यालयात पोलिसी गणवेशात येत होता. कधी साध्या वेशात येत होता. या इसमाने तरूणी कार्यरत असलेल्या कार्यालयात सतत येऊन पीडित तरूणी बरोबरची ओळख वाढवली. तिच्याशी संवाद साधून तिचा विश्वास संपादन केला. तरूणीचा विश्वास संपादन केल्यानंतर इसमाने तरूणीला लग्नाची मागणी केली.
पोलीस खात्यामध्ये सरकारी नोकरीत असलेला वर मिळतो म्हणून पीडित तरूणीने इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर इसमाने तरूणीचे नातेवाईक, मित्र यांना आपण मुंबई पोलीस दलात साहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचे वातावरण निर्माण केले. तो इसम पीडित तरूणी आणि नातेवाईक यांच्यात पोलिसी रूबाबात वावरत होता.
या इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तरूणीने त्याच्या बरोबरच्या विवाहाला संमती दिली. त्यानंतर विवाहाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी पीडित तरूणीकडून साखरपुड्याचे निमित्त करून चार ग्रॅम वजनाची सोन्याची चाळीस हजार रूपये किमतीची अंगठी इसमाने तरूणीकडून उकळली. त्यानंतर आवश्यक कामासाठी ३० हजार रूपये घेतले. या सगळ्या प्रकारानंतर पीडित तरूणीने इसमा बरोबर लग्नाचा तगादा लावला. त्यावेळी इसम विविध कारणे देऊन तरूणीला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्याने पीडितेच्या संपर्काला उत्तर देण्यास टाळाटाळ सुरू केली.
इसमाकडे तीन मोबाईल होते. हे तिन्ही मोबाईल नंतर बंद येऊ लागले. आपली फसवणूक इसमाने केल्याचे आणि तो तोतया पोलीस अधिकारी असल्याची खात्री पटल्यावर पीडितेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ याप्रकरणाचा तपास करत आहेत.