ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी येथील काल्हेर भागात एका २८ वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिलेचा मृतदेह सलग तीन दिवस तिच्या घरात तसाच पडून होता. घरातून दुर्गंध सुटल्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा प्रियकर विकास अडगळे याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला मागील दोन वर्षांपासून काल्हेर येथील ‘जय माता दी’ कंपाऊंड परिसरात आपल्या प्रियकरासोबत राहत होती. तिची पाच वर्षांची मुलगी देखील त्यांच्यासोबतच राहत होती. मृत महिलेनं आरोपी प्रियकरासाठी आपल्या पतीला सोडलं होतं. आरोपी प्रियकर विकासला दारू पिण्याचं व्यसन होतं. यातून तो तिला वारंवार मारहाण करत होता. यातूनच तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, २१ एप्रिल रोजी महिलेच्या घरातून प्रचंड दुर्गंधी सुटली होती. संशय आल्यानं शेजाऱ्यांनी तात्काळ घटनेची माहिती नारपोली पोलिसांना दिली. पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, भयावह अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. यानंतर नारपोली पोलिसांनी याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना दिली. याप्रकरणी गुरुवारी महिलेच्या बहिणीनं आरोपी प्रियकर विकास अडगळे याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत विकासला कळवा येथून अटक केली.

तीन दिवस घरात सडत होता मृतदेह
मागील काही वर्षांपासून आरोपी विकास आणि मृत महिला यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून महिला पतीला सोडून तिच्या पाच वर्षीय मुलीसह विकासकडे राहण्यास आली होती. पण काही दिवसांपूर्वी महिलेची मुलगी आपल्या आजोळी राहण्यास गेली होती. दरम्यान विकास आणि ती असे दोघेच घरी राहत होते. दारुच्या नशेत विकास तिला सतत मारहाण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. १८ एप्रिल रोजी सकाळी विकास घरी आल्यानंतर त्यानं हा प्रकार पाहिला आणि घाबरलेल्या अवस्थेत घरातून निघून गेला. पण सांयकाळी पुन्हा घरी येऊन त्यानं मृतदेह खाली उतरवला आणि घराला कुलूप लावून कळव्याला पळून गेला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. घटनेचा पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman commit suicide dead body remained rotting in house for 3 days crime in thane rmm