कल्याण – कल्याण पश्चिमेतील वालधुनी भागात अशोकनगरमध्ये शनिवारी दुपारी एका ३८ वर्षाच्या महिलेने आपल्या आठ वर्षाच्या बालकाला घराबाहेर काढले. घराचा दरवाजा आतून बंद करून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

निशा सम्राट मर्चन्डे असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेच्या नातेवाईकांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. पोलीस ठाण्यातील प्राथमिक चौकशी अहवालातील माहिती अशी, की शनिवारी दुपारी निशा मर्चन्डे यांनी आपल्या आठ वर्षाच्या बालकाला घराबाहेर काढले. आईने घराबाहेर काढल्याने मुलगा बाहेर मोठ्याने रडायला लागला. घराबाहेर मुलगा का रडतो म्हणून शेजाऱ्यांनी चौकशी सुरू केली. मुलाला आईने घरात घ्यावे म्हणून शेजाऱ्यांनी निशा यांचा घराचा दरवाजा ठोठावण्यास सुरूवात केली. त्यांनी दरवाजा उघडावा म्हणून गळ घातली. पण आतून निशा कोणताच प्रतिसाद देत नव्हत्या.

शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी निशा यांच्या घराचा दरवाजा तोडला. घरात प्रवेश केला. त्यावेळी निशा यांनी शय्या गृहातील पत्र्याच्या छताच्या लोखंडी पट्टीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शेजाऱ्यांनी तातडीने निशा यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्यांना पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी निशा यांना मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंकर शिंदे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader