ठाणे : पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून ४५ वर्षीय महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी महिलेने एक चित्रीकरण केले होते. त्यामध्ये तिने आत्महत्येस तिच्या पतीला आणि त्याच्या प्रेयसीला जबाबदार धरले होते. महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेचा पती भारतीय रेल्वेत तिकीट तपासणीस म्हणून कामाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

कोलशेत भागात ४५ वर्षीय महिला तिचा पती आणि तीन मुलांसोबत राहत होती. तिच्या पतीचे तिच्याच एका नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या कारणांवरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. महिलेने जाब विचारल्यानंतर तिला मारहाण देखील झाली होती. या सर्व त्रासाला कंटाळून १६ मार्चला महिलेने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने मोबाईलमध्यये एक चित्रीकरण तयार केले होते. या चित्रीकरणात तिने पती, त्याची प्रेयसी आणि एका नातेवाईकाचे नाव घेत आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी तिच्या मुलाने सोमवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालेला आहे.