डोंबिवली – एकाच गावातील निवास असल्याने झालेल्या मैत्रीमधून एका तरुणाने एका महिलेबरोबर मोबाईलमधून छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रांचा आधार घेऊन आरोपी तरुण महिलेला छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन सारखे पैसे मागत होता. या सततच्या छळाला कंटाळून महिलेने डोंबिवलीतील देसलेपाडा येथील आपल्या राहत्या घराच्या सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
गेल्या महिन्यात हा प्रकार घडला आहे. मृत महिला ही कष्टकरी घरातील आहे. मजुरीसाठी ती आपल्या कुटुंबासह हरयाणा राज्यातील कैथल जिल्ह्यातील डोंगर पट्टी गावातून डोंबिवलीत आली. ही महिला आपल्या कुटुंबासह डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा नवनीतनगर येथील रविकिरण सोसायटीत राहत होती. अजय ऋषीपाल (३३) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा – साकेत खाडी पुलावरून अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांचा निर्णय
पोलिसांनी सांगितले, आरोपी अजय आणि मृच महिला हे हरियाणामधील एकाच गावामधील रहिवासी आहेत. त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती. या मैत्रीतून आरोपी तरुणाने महिलेबरोबर मे महिन्यात मोबाईलमधून छायाचित्रे काढली होती. मैत्रीतून ही छायाचित्रे काढल्याने आरोपी अजय त्याचा दुरुपयोग करील असे महिलेला वाटले नाही. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत अजयने महिलेला या छायाचित्रांचा आधार घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली.
तू मला पैसे दे, नाहीतर तुझ्यासोबत काढलेली छायाचित्रे मी समाज माध्यमांवर प्रसारित करतो, असे अजय महिलेला सांगू लागला. समाज माध्यमावर आपल्या मैत्रीची छायाचित्रे प्रसारित झाली तर कुटुंबीयांसह समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती महिलेला वाटू लागली. अजयने पैशाचा तगादा सुरूच ठेवला. महिलेकडून पैसे मिळत नाहीत हे पाहून त्याने मैत्रीची छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित केली. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने गेल्या महिन्यात आपल्या राहत्या घराच्या सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
हेही वाचा – ठाकरे आणि शिंदे गट एकाचवेळी आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी
मानपाडा पोलीस ठाण्यात महिलेचा नातेवाईक भीम सिंह यांनी तक्रार केली. पोलिसांनी डोंबिवलीत, हरयाणा येथे जाऊन चौकशी केल्यानंतर हा गुन्हा दाखल केला. साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.