डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या सुवर्णा अविनाश सरोदे (२६) या महिलेचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी जोपर्यंत निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी शास्त्रीनगर रुग्णालयासमोर ठिय्या मांडला आहे.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी याठिकाणी मागविण्यात आली आहे. मयत सुवर्णा सरोदे यांच्या नातेवाईकांनी माध्यमांना दिलेल्या माहीतीनुसार, सुवर्णा या कुटुंबीयांसह डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव भागात राहत होत्या. मंगळवारी त्यांना प्रसूतीसाठी नातेवाईकांनी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर प्रसुती शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांचे बाळ सुखरूप आहे. परंतु, या शस्त्रक्रियेनंतर सुवर्णा यांची प्रकृती बिघडू लागली.
अधिकचा रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना रक्ताची गरज आहे असे सांगून डॉक्टरांनी तिच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. तिची प्रकृती सुधारेल असा दिलासा डाॅक्टरांनी दिला. सुवर्णाची तब्येत अधिकच ढासळू लागल्यावर उपचारी डॉक्टरांनी कुटुंबीयांना सुवर्णा यांना अधिकच्या उपचारासाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यावेळी सुवर्णाची गर्भाशय पिशवी डॉक्टरांनी कुटुंबीयांच्या कोणतीही संमतीविना परस्पर काढल्याचे तिच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. हा विषय डॉक्टरांनी आम्हाला का सांगितला नाही, असा प्रश्न कुटुंबीयांनी केला.
उपचार सुरू असतानाच सुवर्णाची तब्येत अधिकच ढासळली. नंतर तिला आम्हाला भेटण्यास नकार देण्यात आला. दरम्यानच्या काळात तिचा मृत्यू झाल्याचा संशय सुवर्णा यांचा पती अविनाश सरोदे यांनी व्यक्त केला. सुवर्णाचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. जोपर्यंत उपचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सुवर्णाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत कुटुंबीयांना शास्त्रीनगर रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राजकीय नेते, पदाधिकारी यांनी पालिका रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याप्रकरणात वैद्यकीय विधी समितीचा अहवाल, शवविच्छेदन अहवाल, फोरेन्सिक अहवाल आल्यानंतर या विषयावर बोलणे योग्य होईल, असे शास्त्रीनगर रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर चौधरी यांनी माध्यमांना सांगितले. तर, याप्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत, दोषींवर कठोर कारवाई करू असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन याप्रकरणाची माहिती घेतली.
याप्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. आमच्यावर फक्त पोलिसांकडून दबाव वाढवला जात आहे. आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही. – अविनाश सरोदे, मयत महिलेचा पती.