अंबरनाथ: मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान कर्जत लोकलमधून पडून एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ स्थानकातून निघालेल्या कर्जत लोकलमधून ही महिला प्रवासी प्रवास करत होती. गर्दीमुळे महिलेला डब्यात शिरता आले नाही, त्यामुळे महिला प्रवासी लोकलमधून पडली, अशी माहिती रेल्वे स्थानक प्रशासनाने दिली आहे. सायंकाळच्या सुमारास जवळपास सर्वच लोकल गाड्या कल्याणहून कर्जत आणि कसाराच्या दिशेने उशिराने धावतात.

हेही वाचा >>> दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार

अंबरनाथ स्थानकातून सायंकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी कर्जत लोकल सुटते. मंगळवारी ही लोकल सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होती. आठ वाजण्याच्या सुमारास ही लोकल अंबरनाथ स्थानकातून निघाली. अंबरनाथ बदलापूर स्थानक दरम्यान गर्दीमुळे ऋतुजा गणेश जंगम या लोकलमधून खाली पडल्या अशी माहिती रेल्वे पोलीसांनी दिली आहे. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.