कल्याण मधील नामांकित दुकानांमध्ये कपडे खरेदीच्या बहाण्याने जाऊन दुकानदाराला नवनवीन कपडे दाखविण्यात गुंतवून महिलांची एक टोळी कपडे चोरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलांनी कल्याणमधील एका दुकानदाराच्या दुकानातील ३२ हजारांचे कपडे चोरले आहेत. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. दुकानदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासून या महिलांचा शोध सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील कपडे दुकानात, गर्दीच्या ठिकाणी बाजारात खरेदीच्या बहाण्याने जाऊन काही महिला दुकानदाराला बोलण्यात गुंतवून कपडे चोरत असल्याच्या प्रकार उघडकीला आला होता. या विषयी उल्हासनगरमधील दुकानदार सावध झाल्यानंतर आपण उल्हासनगर पोलिसांच्या तडाख्यात सापडू या भीतीने या महिलांच्या टोळीने आता कल्याणमध्ये शिरकाव केला आहे.
पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेतील दुकानदार पूजा गुप्ता यांच्या केशाज लेडीज गारमेंट दुकानात संध्याकाळी सहा वाजता एका पाठोपाठ सहा महिला कपडे खरेदीसाठी आल्या. दुकानातील मंचावरील कामगारांनी तात्काळ या महिलांना त्यांच्या मागणीप्रमाणे नवनवीन कपडे दाखविण्यास सुरूवात केली. या महिला स्वतंत्रपणे कपडे खरेदीसाठी आल्या आहेत असे दुकानदाराला वाटले. त्यामुळे त्यांनी महिलांच्या मागणीप्रमाणे नवीन कपडे दाखविण्यास सुरूवात केली. कामगार नवीन कपडे आणण्यासाठी दुकानाच्या आतील भागात गेला की, या महिला कपडे उचकटून तो पडद्यासारखा धरून आपणास कसा होईल असा बहाणा करत होत्या. या पडद्यामागून एक महिला मंचावर ठेवलेले कपडे चोरून पटापट पिशवीत टाकत होती. अशाप्रकारे या सात महिलांनी दुकानातील ३२ हजार रूपयांचे नामवंत नाममुद्रा असलेल्या कपडा कंपन्यांचे नवीन कपडे पिशव्यांमध्ये भरून चोरले.
या महिला दुकानातून गेल्यानंतर दुकानदार, कामगारांच्या महिलांना दाखविलेले काही कपडे मंचावर नाहीत आणि महिलांनी खरेदीही केले नाहीत असे निदर्शनास आले. दुकानदाराने या महिला दुकानातून गेल्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यांना महिला कपडे खरेदी करत असताना कामगार दुकानाच्या आतील भागात गेला की कपडे चोरून पिशवीत टाकत असल्याचे दिसले. या महिलांनी दुकानातील नामचिन कंपन्यांचे कपडे चोरले आहेत अशी खात्री झाल्यावर दुकानदार पूजा गुप्ता यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या महिलांचा शोध सुरू केला आहे.
कपडे चोरणारी महिलांची एक टोळी उल्हासनगर, कल्याणमध्ये सक्रिय असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.