कल्याण- कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळ उभी असलेल्या एका महिले जवळ दोन जण २०० रुपयांची मागणी करू लागले. या महिलेने त्याकडे दुर्लक्ष करुन तिने या दोघांची तक्रार मोबाईल वरुन आपल्या नातेवाईकांकडे केली. त्याचा राग आल्यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही तरुणांनी जवळील धारदार पातेने (ब्लेड) महिलेवर वार करुन तिला गंभीर जखमी केले.
अचानक घडलेल्या या प्रकराने महिला घाबरली. पादचाऱ्यांनी ओरडा केल्यानंतर दोन्ही मारेकरी पळून गेले. याप्रकरणाची महिलेकडून तक्रार होताच, पोलिसांनी रेल्वे स्थानक भागातील घटना घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रिकरण तपासून मारेकऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली. रहिम शेख, ख्वाजा शेख अशी आरोपींची नावे आहेत. सोमवारी सकाळी ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले, एक महिला सकाळी कल्याण रेल्वे स्थानका जवळ नातेवाईकाची वाट उभी होती. तेथे दोन तरुण आले. ते पादचारी असल्याचे समजून महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. ते तरुण महिलेकडे २०० रुपयांची मागणी करू लागले. महिलेने पैसे कसले मागता म्हणून प्रतिप्रश्न केला. दोघांनी २०० रुपये देण्याचा आग्रह कायम ठेवला. त्या दोघांपासून महिला दूर होऊन तिने घडला प्रकार आपल्या नातेवाईकाला मोबाईलवरुन कळविला. हे बोलणे दोन्ही आरोपींनी ऐकले. आपली तक्रार करण्यात आली आहे हे समजताच दोन्ही तरुणांनी जवळील पातेने महिलेवर काही कळण्याच्या आत वार केले. महिला गंभीर जखमी झाली. पादचाऱ्यांनी ओरडा केल्यानंतर आरोपी पळून गेले.
या महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी घटना घडल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रिकरण तपासून रहिम, ख्वाजा शेख यांना अटक केली. पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दोघांची चौकशी केली. त्यावेळी ख्वाजा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात पुढे आले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी यापूर्वी असे प्रकार केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.