Couple Booked for duping woman डोंबिवली एमआयडीसीतील एका उद्योजक महिला आणि इतर गुंतवणूकदारांची उल्हासनगर मधील पती, पत्नीने व्यवसायातील गुंतवणुकीच्या माध्यमातून ३१ लाख ५८ हजार ४८० रूपयांची फसवणूक केली आहे. मागील दोन वर्षाच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या महिलेने याप्रकरणी तक्रार केली आहे.
रश्मी संदीप संत असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर भागात राहतात. त्या उद्योजक आहेत. विजय मुकुंद परब, दर्शना विजय परब असे फसवणूक करणाऱ्या पती, पत्नीचे नाव आहे. हे दाम्पत्य उल्हासनगर मधील व्हिनस सिनेमा समोरील गजानन नगर मधील भक्ती निवासमध्ये राहते. ते मुळचे कणकवली येथील रहिवासी आहेत.
हेही वाचा >>> Central Railway Trains : उपनगरीय गाड्यांच्या विलंबामुळे प्रवासी हैराण; नोकरदारांकडून नाराजी
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार रश्मी संत आणि आरोपी दर्शना व विजय परब यांची व्यापार व्यावसायिकतेच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपी परब दाम्पत्याने रश्मी संत यांना आमच्या दर्शना एन्टरप्रायझेस या कंपनीत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला अल्पकाळात आकर्षक मोबदला आम्ही देऊ. कमी कालावधीत जास्त परतावा मिळत असल्याने रश्मी आणि त्यांच्या परिचित इतर गुंतवणूकदारांनी विजय यांनी सांगितल्या प्रमाणे टप्प्याने आपल्या बँक खात्यामधून एक कोटी तीन लाख २४ हजार रूपये विजय यांच्या बँक खात्यात जमा केले.
या गुंतवणूक रकमेवर सुरूवातीच्या काळात परब दाम्पत्याने गुंतवणुकीच्या ठरल्या कराराप्रमाणे रश्मी आणि इतर गुंतवणूकदार यांना ७१ लाख ६५ हजार ५२० रूपयांचा आकर्षक परतावा दिला. उर्वरित रक्कम परताव्यासह परत करण्याची मागणी रश्मी आणि इतर गुंतवणूकदार यांनी परब दाम्पत्याकडे सुरू केली. त्यावेळी खोटी कारणे देऊन, वेळकाढूपणा करून ते पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होते. दोन वर्ष उलटले तरी परब दाम्पत्य आपले पैसे परत करत नाहीत. ते आपले पैसे परत करण्याची शक्यता नसल्याने त्यांनी आपला पैसा स्वार्थासाठी वापरून आपल्या रकमेचा अपहार केला म्हणून रश्मी संत आणि इतर साक्षीदारांंनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी परब दाम्पत्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे तपास करत आहेत.