लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण- मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेसमध्ये गुरुवारी सकाळी बिहारचा राज्यातील रहिवासी असलेल्या एका शिक्षकाने कर्जत जवळ एका महिलेचे आपल्या मोबाईलमधून चित्रिकरण केले. त्यानंतर या शिक्षकाने महिलेची छेड काढली. सहप्रवाशांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन हा गुन्हा कर्जत रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत घडला असल्याने तेथे चौकशीसाठी वर्ग केला आहे. मोहमद अश्रफ असे या शिक्षकाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी सांगितले, बिहार राज्यातील सितामढी जिल्ह्यातील एका मदरशामध्ये मोहमद अश्रफ शिक्षक आहे. तो मदरशाच्या कामासाठी मुंबईत येत होता. सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करत असताना कर्जत रेल्वे स्थानक परिसरात त्याने गुपचूप आपल्या मोबाईलमधून एक्सप्रेस डब्यात बसलेल्या एका महिलेचे चित्रीकरण केले. नंतर तिची छेड काढली.

सहप्रवाशांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी मोहमदला जाब विचारला. त्याने केल्या कृत्याची कबुली दिली. सहप्रवाशांनी मोहमदला कल्याण रेल्वे स्थानकात उतरवून त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन तो कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे चौकशीसाठी वर्ग केला. त्याच्या विरुध्द बाललैंगिक अत्याचार, विनयभंग कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader