अंबरनाथः अंबरनाथ शहराच्या मध्यवर्ती भागात एका महिलेची भरदिवसा हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास उड्डाणपुलाला त्याखालील रस्त्याला जोडणाऱ्या पायऱ्यांशेजारी ही हत्या झाली. यातील महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र एका व्यक्तीने चाकू भोसकून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी  दिली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

अंबरनाथ पूर्वेतील हुतात्मा चौक परिसरातून पूर्वेत जाणाऱ्या मार्गिकेवर उड्डाणपुल आहे. या उड्डाणपुलाला स्थानक रस्त्याला जोडण्यासाठी पायऱ्या आहेत. या भागातून एक महिला आणि पुरूष बोलत असताना काही प्रत्यक्षदर्शींना दिसले. काही काळानंतर पुरूषाने चाकूने महिलेला भोसकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. भोसकल्यानंतर तात्काळ आरोपीने जागेवरून पळ काढला. त्यानंतर काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेला जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केला असून महिलेची ओळख पटू शकलेली नाही. तर संशयीत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Story img Loader