कल्याण : कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ भागातील नमस्कार ढाब्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एका रिक्षा चालकाने भरधाव वेगात रिक्षा चालवून दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत या महिलेला गंभीर दुखापती झाल्या असून दुचाकीची मोडतोड झाली आहे.
या अपघातानंतर रिक्षा चालक जखमी महिलेला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून रिक्षा सोडून पळून गेला आहे. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारदार जखमी महिला पूजा इटोरिया यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्या चक्कीनाका भागात राहतात.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार पूजा इटोरिया या कल्याण पूर्वेतील नांदिवली नाका येथून चक्की नाका भागातील वाहतूक बेटाला वळसा घालून दुचाकीवरून जात होत्या. यावेळी त्यांची दुचाकी नांदिवली तर्फ येथील नमस्कार ढाब्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावरील आली. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात, निष्काळजीपणे रिक्षा चालवत एक रिक्षा चालक आला. त्याने पूजा इटोरिया यांच्या दुचाकीला जोराने धडक दिली.
हेही वाचा…स्वीकृत झालेल्या २५० झोपु योजनांतील विकासकांची हकालपट्टी
या धडकेत दुचाकी काही फूट अंतरावर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला तक्रारदार यांच्यासह पडली. पूजा यांच्या हात, पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्या दुचाकीची मोडतोड झाली आहे. पूजा रस्त्याच्या कडेला पडल्या आहेत. त्या जखमी झाल्या आहेत हे माहिती असुनही रिक्षेची धडक देणारा रिक्षा चालक त्यांना कोणतीही मदत न करता तो घटनास्थळावरून पळून गेला. इतर पादचाऱ्यांनी तक्रारदार यांना मदत केली. कोळसेवाडी पोलिसांनी रिक्षा चालकाविरुध्द गुन्हा दाखल करून रिक्षा वाहन क्रमांकावरून रिक्षा चालकाचा शोध सुरू केला आहे.