ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील पूलावर फेरीवाल्यांच्या टोळीने एका प्रवासी महिलेला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भालचंद्र डोकरे (४७) आणि शाकीर शेख (४५) या दोघांना अटक केली आहे. यापूर्वीही ठाण्यात फेरीवाल्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा घटना उघडकीस आल्या होत्या. त्यात आता प्रवाशांवरही हल्ला होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा… Dasara Melava 2022 Live : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं स्वरुप ? कधी भाषण करणार?, वाचा प्रत्येक घडामोड…

कोपरी येथे ५२ वर्षीय महिला राहत असून रविवारी त्या कामानिमित्ताने दादर येथे गेल्या होत्या. दादर येथून सायंकाळी त्या पुन्हा उपनगरीय रेल्वेगाडीने घरी परतत होत्या. ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर मुंबई दिशेकडील जुन्या पूलावरून कोपरीच्या दिशेने जात असताना पादचारी पूलावरील शाकीर शेख या फेरीवाल्याच्या बाकड्याला त्यांचा धक्का लागला. त्यामुळे फेरीवाल्याने महिलेसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर महिलेने पोलिसांना संपर्क साधला असता, भालचंद्र डोकरे नावाचा व्यक्ती त्याठिकाणी आला. त्याने त्याच्या सहकाऱ्यांसह महिलेला मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांचा विनयभंग केला. ही मारहाण होत असताना एकही प्रवासी त्यांच्या मदतीसाठी आला नाही. काही वेळानंतर कोपरीतील स्थानिक रहिवासी त्याठिणाहून जात असताना त्यांनी फेरीवाल्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु फेरीवाल्यांनी त्यांना मारहाण सुरूच ठेवली. दरम्यान, लोहमार्ग पोलीस त्याठिकाणी आल्यानंतर मारहाण करणाऱ्या टोळीतील काही फेरीवाले पळून केले. दरम्यान, पोलिसांनी शाकीर आणि डोकरे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे.

हेही वाचा… Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कला ट्रेनने तर बीकेसीला बसने जाणाऱ्या शिवसैनिकांची गर्दी

या घटनेमुळे ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी कायम असल्याचे चित्र आहे. यापूर्वी या स्थानक परिसरातील फेरीवाल्यांकडून अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. परंतु फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

हेही वाचा… Dasara Melava 2022: विचित्र हातवारे करणाऱ्या शिंदे गटातील समर्थकांना ठाकरे गटातील महिलांचा चोप

फेरीवाल्यांची अरेरावी वाढली आहे. स्थानक परिसरातील फेरीवाले हे गुंड प्रवृत्तीचे आहेत. परंतु प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. फेरीवाल्यांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी मला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यांचा प्रमुख भालचंद्र हा त्याठिकाणी आला. त्यानंतर त्याच्या टोळीने माझ्यावर हल्ला केला. या फेरीवाल्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. या फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाईसाठी मंत्री, रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करणार आहे. – जखमी प्रवासी महिला.