डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर सोमवारी संध्याकाळी सात वाजता एका महिलेची पर्स बाकड्यावर पडली होती. एका जागरूक प्रवाशाच्या हा प्रकार निदर्शनास येताच, त्याने रेल्वे पोलीस, स्थानक व्यवस्थापक यांना ही माहिती दिली. पर्स कोणाची, त्यात काय आहे, यामुळे काही वेळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ती पर्स एका मूक आणि अंध महिलेची आणि ती दादर रेल्वे स्थानकात असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली. या मुक्या दाम्प्त्याने डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन स्वत:ची ओळख पटवून पर्स आणि त्यामधील दोन मोबाईल ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीतील रहिवासी आणि पत्रकार श्रीकांत खुपेरकर सोमवारी उल्हासनगर येथे कुटुंबासह गेले होते. तेथून लोकलने परत येत असताना ते डोंबिवली स्थानकात फलाट क्रमांक पाचवर संध्याकाळी ७.२१ वाजता उतरले. लोकल निघून गेल्यावर आणि फलाटावर गर्दी नसताना त्यांना फलाट क्रमांक पाचवर एका बाकड्यावर एका महिलेची पर्स पडली असल्याची दिसली. त्यांनी उपस्थित महिला, पुरुषांना पर्स कोणाची म्हणून विचारणा केली. कोणी पर्सचा ताबा घेण्यास पुढे आले नाही. खुपेरकर यांनी ही माहिती साहाय्यक रेल्वे स्थानक व्यवस्थापक संत लाल, रेल्वे सुरक्षा बळाच्या हवालदार अनिता वर्मा, हवालदार व्ही. पी. भैवर, लोहमार्ग पोलीस जयदीप पवार, पाॅईंटमन दत्तू गोवर्धने यांना दिली. पर्स साहाय्यक स्थानक व्यवस्थापक संत लाल यांच्या ताब्यात देण्यात आली. लाल यांनी पर्स तपासली तर त्यात दोन मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र होते.

हेही वाचा – ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण, राजन विचारे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत म्हणाले…

पोलिसांनी पर्स कोणाची म्हणून शोध सुरू केला असतानाच दादर रेल्वे पोलीस ठाण्यातून डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात फोन आला की डोंबिवलीतील एका मूक आणि अंध महिला तिची पर्स डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर विसरली आहे. तिच्यासोबत तिचा मूक पती आहे. ते अहमदाबाद येथे चालले आहेत. मुकी महिला दादर पोलिसांना पर्स हरविल्याची माहिती खुणा करून देत होती. त्यांना काही वेळ नक्की काय झाले आहे हे कळत नव्हते. अखेर पोलिसांनी तक्रारदार महिला दीपाली झेंडे यांच्याकडून खुणांच्या साहाय्याने सगळी माहिती घेतली. महिलेची पर्स हरविल्याची माहिती पोलिसांना समजली.

हेही वाचा – संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान; म्हणाले, “तुमच्या मनगटात खरंच स्वाभिमानी रक्त असेल, तर…!”

डोंबिवलीचे साहाय्यक स्थानक व्यवस्थापक लाल यांनी महिला आणि तिच्या पतीने डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन पर्सचा ताबा घ्यावा. अन्य कोणाच्याही ताब्यात ही पर्स दिली जाणार नाही, असे सांगितले. मूक महिला झेंडे हिने पतीसह रात्री नऊ वाजताच्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन साहाय्यक व्यवस्थापक लाल आणि रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीत पर्सचा ताबा घेतला. जागरूक प्रवासी खुपेरकर यांच्यामुळे पर्स आणि त्यामधील ऐवज मिळाल्यामुळे झेंडे दाम्पत्याने त्यांचेही कौतुक केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman purse forgotten at dombivli railway station returned ssb
Show comments