लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : कल्याणमध्ये राहत असलेल्या एका २३ वर्षाच्या महिलेला सरबत, नाष्ट्यामध्ये गुंगीचे द्रव्य टाकून तिच्यावर तिच्या मनाविरूध्द शारीरिक संबंध करणाऱ्या डोंबिवलीतील देवीचापाडा भागातील एका ४२ वर्षाच्या व्यक्ति विरुध्द पीडित महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर या कालावधीत संबंधित व्यक्तिने आपल्यावरलैंगिक अत्याचार केले आहेत, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
पीडित महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, संबंधित व्यक्तिने आपल्याला नाष्टा, सरबतामध्ये गुंगीचे द्रव्य टाकून खाण्यास, पिण्यास दिले. त्यानंतर संबंधिताने आपल्या मनाविरुध्द आपल्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच या प्रकाराचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढून ती समाज माध्यमावर सामायिक करण्याची धमकी दिली. संबंधित व्यक्तिने केलेल्या सततच्या लैंगिक अत्याचारामुळे मी गर्भवती राहिली. ही माहिती आपण संबंधित व्यक्तिला दिल्यावर ही माहिती तू कोणालाही सांगू नकोस नाहीतर तुझ्या आई वडिलांना मी मारून टाकीन अशी धमकी दिली.
आणखी वाचा-डोंबिवलीत मालमत्ता कर थकविणाऱ्या क्रिटीकल केअर सेंटरसह पाच गाळे सील, पालिकेच्या ग प्रभागाची कारवाई
आपण गर्भपात करू, पण त्यासाठी अगोदर माझ्याशी लग्न करावे लागेल. हा प्रकार कोणालाही सांगितला तर मी जीवाचे बरेवाईट करून घेईन, अशी धमकी पीडितेला दिली. यापूर्वी संबंधित व्यक्तिची दोन लग्न झालेली असताना सुध्दा ती माहिती व्यक्तिने पीडितेपासून लपवून ठेवली. हा प्रकार पीडितेच्या लक्षात आल्यावर संबंधिताने आपली फसवणूक केली. तसेच गर्भपाताच्या नावाने आपल्याकडून तीन लाख रूपये टप्प्याने घेतले म्हणून पीडितेने संबंधिता विरुध्द तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. लोखंडे तपास करत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल व्यक्तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.