कल्याण- कामावरून घरी परतत असलेल्या एका विवाहितेला तरूणाने पकडून जबरदस्तीने झुडपात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. टिटवाळा रेल्वे मार्गाजवळील परिसरात सोमवारी रात्री साडे आठ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
निशांत चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. तो भिवंडी तालुक्यातील पडघा गावाजवळील एका खासगी कंपनीत काम करतो, असे साहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, टिटवाळा येथे आपल्या कुटुंबासह राहणारी एक महिला शहाड येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. सोमवारी रात्री ती कामावरून घरी चालली होती. घरी जाण्यास उशीर झाला म्हणून या महिलेने रेल्वे मार्गाजवळील मधल्या रस्त्याने घर गाठण्याचा प्रयत्न केला. रेल्वे स्थानकाजवळून काही अंतर पुढे गेल्यावर तेथे अंधार आणि आजुबाजुला झुडपे, रानगवत होते.
हेही वाचा >>>बेदम मारहाण करून प्रवाशाकडील रोकड लुटली; कल्याण रेल्वे स्थानकाजवळील परिसरात घडला प्रकार
महिला पतीशी मोबाईलवर बोलत चालली होती. ज्या भागात अंधार होता, तेथे आरोपी निशांत चव्हाण याने पीडितेला जबरदस्तीने खेचून बाजुच्या झुडपात नेले. तिने जोरदार प्रतिकार केला. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. महिलेने त्या अंधार भागातून झुडपातून वाट काढत मुख्य रस्ता गाठला. तोपर्यंत तिचा पती आणि शेजारी तेथे पोहचले होते. त्यांनी तातडीने टिटवाळा पोलीस ठाण्यात संपर्क साधला. टिटवाळा पोलिसांनी तातडीने ही माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. पिडीतेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी टिटवाळा रेल्वे स्थानक, घटना घडली त्या भागाचे सीसीटीव्ही चित्रण तपासून निशांत चव्हाण याला अटक केली. या प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला आहे.