लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाची सोन्याचे मंगळसूत्र असलेली पिशवी चोरणाऱ्या एका महिलेला कल्याण लोहमार्ग गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने टिटवाळा येथून गुरुवारी अटक केली. तिच्याकडून चार लाख २५ हजार रुपये किमतीचे चोरीचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी हस्तगत केले.
कविता डुमरे असे अटक महिलेचे नाव आहे. गेल्या आठवड्यात ठाकुर्ली रेल्वे स्थानकात एक महिला लोकलची वाट पाहत बसली होती. बाजुलाच पिशवी ठेवली होती. त्यात तिने स्वताचे सव्वा चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ठेवले होते. प्रवासी महिलेची नजर चुकवून तिच्या जवळील सोन्याचा ऐवज असलेली पिशवी चोरीला गेली होती. तिने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
आणखी वाचा-ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील म्हसोबा चौकाला टपऱ्यांचा विळखा, टपऱ्यांना राजकीय पक्षांचे फलक
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, राजेंद्र दिवटे, जनार्दन लेकर, अजय रौंदळ, वैभव जाधव, स्मिता वसावे, रवींद्र ठाकूर, अजित माने, अजिम इनामदार, गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण, महेंद्र कार्डिले यांनी या चोरीचा तपास सुरू केला. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये एक महिला पिशवीची चोरी करत असल्याचे पोलिसांना दिसले. चोरी केल्यानंतर ही महिला रेल्वे स्थानकाबाहेर निघून गेली. रेल्वे स्थानका बाहेर सीसीटीव्ही नसल्याने चोरट्या महिलेचा शोध घेणे अवघड होते.
पथकाने कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. ही महिला कल्याणहून मुलासह ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उतल्याचे दिसले. पोलिसांनी कल्याण ते कर्जत, कसारा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. या तपासणीत महिला टिटवाळा येथे लोकलमधून उतरत असल्याचे आढळले. पोलिसांनी टिटवाळा भागात सापळा लावून या महिलेची ओळख पटवली. तिला टिटवाळ्यामधून गुरुवारी अटक केली. तिने ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील चोरीची कबुली दिली. या महिलेने आतापर्यंत किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. याचा तपास सुरू आहे, असे वरिष्ठ निरीक्षक शेख यांनी सांगितले