कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकात एका प्रवाशाने तिकिट देणाऱ्या एका तिकीट लिपिकाला (बुकिंग क्लर्क) महिलेच्या तिकीट दालनात घुसून लाथाबुक्क्यांनी शुक्रवारी दुपारी बेदम मारहाण केली. तिकीट लिपिक महिला बेशुध्द झाल्याने तिला तिच्या सहकाऱ्यांनी कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरीस गेला असल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले.
सुट्टे पैशावरून रेल्वे प्रवासी आणि जखमी महिला यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वादातून पुरूष प्रवाशाने या महिलेला मारहाण केली आहे. अन्सर शेख (३५) असे मारहाण करणाऱ्या प्रवाशाचे नाव आहे. रोशनी पाटील असे जखमी तिकीट लिपिक महिलेचे नाव आहे, असे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन मिळतो कसा? राज ठाकरे यांचा ठाणे पोलिसांना प्रश्न
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांदे यांनी सांगितले, रेल्वे प्रवासी अन्सर शेख हा कल्याण रेल्वे स्थानकात लोकल तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकीवर आला होता. त्यावेळी तिकीट दालनात तिकीट लिपिक रोशनी पाटील या कार्यरत होत्या. तिकीट लिपिक रोशनी पाटील यांनी अन्सर शेख यांना सुट्टे पैसे देण्याची मागणी केली. सुट्टे पैसे दिले तर तात्काळ तिकीट देणे सोयीस्कर होईल असे पाटील अन्सर यांना सांगत होत्या. यावेळी अन्सरने रोशनी यांच्याशी सुट्ट्या पैशांवरून वाद घातला. शाब्दिक वाद वाढत गेला.
या रागाच्या भरात अन्सर शेख याने तिकीट लिपिक बसलेल्या तिकीट दालनाचा दरवाजा ढकलून प्रवेश केला. त्याने तेथे रोशनी पाटील यांना शिवीगाळ करत ठोशाबुक्के, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या एकट्याच असल्याने अन्सरबरोबर त्या प्रतिकार करू शकल्या नाहीत. या मारहाणीनंंतर रोशनी बेशुध्द होऊन कोसळल्या. या महिलेच्या गळयातील सोन्याचा ऐवज गायब आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली नांदिवलीतील बेकायदा राधाई कॉम्पलेक्सचा विकासक मयुर भगतला अटक, राधाईच्या जमीन मालकाला मारहाण
हा प्रकार त्यांच्या सहकाऱ्यांना समजल्यावर सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांना ही माहिती मिळताच ते पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने कल्याण रेल्वे स्थानकात शोध घेऊन रोशनी पाटील यांचा मारेकरी अन्सर शेख याला अटक केली. अन्सर शेखवर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिकीट कारकुनाला कोणतीही सुरक्षा नसल्याने त्यांच्यावर असे प्रकार नेहमी येतात. अनेक वेळा प्रवाशांच्या शिवीगाळ, मारहाण सारख्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तिकीट कारकुन दालन भागात सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत काही वेळ कल्याण रेल्वे स्थानकात तिकीट कारकुनांनी काम बंद आंदोलन केले. सरकारने या मागणीचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी रेल्वे तिकीट कारकुनांनी केली.