ठाणे : घोडबंदर भागात २०१७ मध्ये घरासमोर राहणाऱ्या तरुणासोबत पतीचे ५५ तोळे सोने, रोकड घेऊन घर सोडून निघून गेलेल्या एका महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा शोध घेण्यास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या मालमत्ता शोध कक्षास यश आले आहे. मागील सहा वर्षांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. परंतु दोघेही कोकण, गोवा, कर्नाटक येथे नाव बदलून वास्तव्य करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून त्या नावाचे पॅनकार्ड आणि आधारकार्डही पोलिसांनी जप्त केले.
हेही वाचा – “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळताच ठाण्यातल्या शाखा…” राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंवर आरोप
हेही वाचा – वडिलांच्या आजारपणाच्या खर्चासाठी मुलाने केली डोंबिवलीत घरफोडी
घोडबंदर भागात २०१७ मध्ये एक महिला घरातून पतीचे ५५ तोळे, रोकड घेऊन एका तरुणासोबत घर सोडून निघून गेल्याचा गुन्हा कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. तिच्या पतीने ही तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या मालमत्ता शोध कक्षाकडून सुरू होता. दरम्यान मालमत्ता शोध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव, जगदीश मुलगीर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील प्रधान, पोलीस हवालदार प्रशांत भुर्के, किशोर भामरे, रूपवंत शिंदे यांच्यासह १५ ते २० जणांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि खबऱ्यांमार्फत माहिती घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, दोघेही कोकणातील चिपळूण तळोजा, रत्नागिरी, तसेच कर्नाटक, गोवा या भागात नाव बदलून वास्तव्य करत असल्याचे समोर आले. त्यांनी खोट्या नावाने गॅझेट बनवून त्या आधारे पॅनकार्ड आणि आधारकार्डही बनविल्याचे समोर आले आहे.