ठाणे : पाचपाखाडी भागात एका जांभळाच्या वृक्षावर रविवारी गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पार्वती शर्मा (३८) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणाची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पार्वती शर्मा ही मूळची नेपाळची असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पार्वती शर्मा या त्यांच्या पतीसोबत अल्मेडा रोड परिसरातील एका गृहसंकुलाच्या आवारात राहतात. त्याच गृहसंकुलात पार्वती यांचे पती सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

दोघेही मूळचे नेपाळचे असून त्यांची मुले नेपाळ येथे राहतात. रविवारी दुपारी परिसरातील एका गृहसंकुलाच्या आवारात जांभळाच्या वृक्षाला पार्वती शर्मा यांचा मृतदेह गळफास घेतलेला आढळून आला. घटनेची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पार्वती यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली आणला.

मृतदेह शववाहिकेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. पार्वती यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल असे नौपाडा पोलिसांनी सांगितले. पार्वती यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मृत्यू बाबतची माहिती दिली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.