ठाणे : शहरातील यशोधननगर भागात प्रभात फेरीला जात असताना एका महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महिलेने वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या तक्रारीच्या आधारावर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संबंधित आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांचा अधिक तपास केला असता त्यांनी आणखी काही गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. हे दोघेही इराणी टोळीतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जाफर युसुफ जाफरी (वय २६) आणि संदिप गिरीषचंद्र प्रसाद (वय २०) असे आरोपींचे नाव आहेत. या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यासह, पोलिसांनी त्यांची आणखी तपासणी केली असता, त्यांनी जबरी चोरीचे १४ आणि शरिराविरूध्दचा एक गुन्हा असे एकुण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

घटना काय ?

ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील यशोधन नगर परिसरात एक महिला आपल्या पतीसोबत प्रभात फेरीला जात होती. त्यावेळी जाफर आणि संदिप या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला. परंतू, महिलेने त्यास विरोध केल्यावर आरोपींनी त्यांना ढकलून खाली पाडले. त्यानंतर, सोनसाखळी चोरून दुचाकीवरुन फरार झाले. याप्रकरणी महिलेने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला.

आरोपींचा शोध कसा घेतला ?

तक्रारदार महिलेकडून आरोपींचे वर्णन जाणून घेतले. आरोपींचे वर्णनानुसार, पथकाने तांत्रिक माहितीचा वापर करून आरोपींच्या पळवाटीचा मागोवा घेतला. त्यावेळी आरोपी चितळसर, कापुरबावडी, खारेगाव टोलनाका, मुंब्रा, डायघर, मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे गेला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचुन पोलिसांनी शिताफीने या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

आरोपींकडून आणखी गुन्हे उघड

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सदर गुन्ह्यातील तसेच इतर गुन्ह्यांतील जबरी चोरी केलेला ऐवज हस्तगत केला आहे. यामध्ये एकूण ३,९०,२४० रुपये किमतीचे ६ तोळे, ४ ग्रॅम, ७४ मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे साखळ्या व मंगळसूत्र जप्त करण्यात आले. याशिवाय, चोरीसाठी वापरण्यात आलेल्या १,२०,००० रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि १५,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. अशा प्रकारे, एकूण ५,२५,२४० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.