ठाणे : आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने आदिवासी महिलांनी मोठी पावले उचलली आहेत. कर्जत तालुक्यातील भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या चिंचवाडी आदिवासी पाड्यातील महिलांनी शिवणकामाच्या माध्यमातून स्वतःच्या रोजगाराचा नवा मार्ग शोधला आहे. या महिलांनी केवळ कापडी पिशव्या आणि पर्सच नाही, तर नववर्षाच्या स्वागतासाठी खास पारंपारिक गुढीवस्त्र तयार करून त्याच्या विक्रीलाही सुरुवात केली आहे.

आदिवासी समाजात प्रामुख्याने परंपरेनुसार, पिढीजात व्यवसाय करण्याकडे आदिवासी बांधवांचा भर असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये महिलांनी रोजगारासाठी पुढे येऊन आर्थिक सक्षमीकरणाची वाट धरावी, यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण तसेच विविध रोजगारासंबंधी वस्तूंचे वाटप केले जाते. परंपरागत पिढीजात व्यवसायावर अवलंबून राहण्याऐवजी चिंचवाडीतील महिलांनी स्वतःच्या कौशल्याचा वापर करून आर्थिक स्वावलंबनाची वाट धरली आहे. शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामीण महिलांसाठी रोजगारनिर्मितीच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण दिले जाते. अशाच एका प्रशिक्षण शिबिरातून चिंचवाडीतील महिलांनी शिवणकाम शिकले.

कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश महाजन, सूज्ञ बोकिल आणि लेले यांनी या महिलांशी संवाद साधला असता, रंजना आणि प्रमिला या दोन आदिवासी महिलांनी आपल्याला शिवणकाम येते आणि त्याचा उपयोग करून रोजगार सुरू करायची इच्छा असल्याचे सांगितले. त्यांच्या इच्छेला पाठबळ देत त्यांना शिलाई यंत्र भेट देण्यात आले. यानंतर, महाजन यांनी त्यांना कापडी पिशव्या आणि पर्स तयार करण्याचे प्रशिक्षण दिले, ज्यामुळे संक्रांतीसाठी या वस्त्रांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

संक्रांतीनंतर या महिलांना पुढे काय शिवायचे, हा प्रश्न समोर होता. त्यावेळी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुढीसाठी लागणारे पारंपरिक गुढीवस्त्र तयार करण्याची कल्पना पुढे आली. महाजन यांच्या मदतीने महिलांनी मोठ्या जिद्दीने गुढीवस्त्र तयार केले आणि त्याला ठाणे, मुंबई, पुणे, जळगाव, बदलापूर आणि अंबरनाथमधून उत्स्फूर्त मागणी मिळाली. तल्याम येथील संजीवनी आदिवासी ग्रुप संस्था आणि नागरिकांकडून या महिलांना मदतीचा हात मिळत आहे. या महिलांना नवनवीन वस्त्र तयार करत ते विक्रीसाठी या उद्देशाने उपाययोजन शोधत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते उमेश महाजन यांनी सांगितले. याच अंतर्गत या आदिवासी महिलांनी महिला दिनानिमित्त महाविद्यालयात होणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, जिथे त्या आपल्या हस्तकलेचे सादरीकरण करणार आहेत. शिवणकामाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या या आदिवासी महिलांनी नव्या रोजगारसंधीचा मार्ग उघडला आहे. ही बाब इतर ग्रामीण आणि आदिवासी महिलांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते. समाजाच्या पाठिंब्याने आणि महिलांच्या जिद्दीने हा प्रवास अधिक यशस्वी होत आहे.

Story img Loader