ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील सी पी तलाव कचरा हस्तांतरण केंद्रावर डम्परच्या चाकाखाली येऊन एका कचरावेचक महिलेचा काही दिवसांपुर्वी मृत्यु झाला होता. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पालिका प्रशासनाने कचराभुमीवर कचरावेचक महिलांना प्रवेश बंद केला आहे. परंतु या निर्णयामुळे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत कचरावेचक महिलांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.
ठाणे महापालिकेचे वागळे इस्टेट भागातील सी पी तलाव परिसरात कचरा हस्तांतरण केंद्र आहे. याठिकाणी कचऱ्याचे मोठे डोंगर तयार झाले असून याठिकाणी काही दिवसांपुर्वी आग लागून परिसरात धूर पसरला होता. साठलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. या प्रकारामुळे स्थानिकांनी येेथे कचरा टाकण्यास विरोध केला होता. यानंतर पालिकेने या हस्तांतरण केंद्रावरील कचरा उचलण्यास सुरूवात केली असून याच कामादरम्यान, ३१ मार्च २०२५ रोजी राजश्री जाधव या कचरा वेचक महिलेचा डम्परच्या चाकाखाली येऊन मृत्यु झाला. या महिलेच्या कुटूंबियांना भारतीय असंघटीत मजुर कामगार संघटनेने २ लाख रुपयाची तर, ठाणे महापालिकेने ५ लाखाची मदत केली होती. तसेच तिच्या मुलाला महापालिकेत कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्यात आली आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी पालिकेकडून याठिकाणी काळजी घेण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून याठिकाणी कचरावेचक महिलांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात भारतीय असंघटीत मजुर कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कचरावेचक महिलांनी मंगळवारी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.
ठाणे महापालिका प्रशासनाच्या निर्णयामुळे २०० महिला कचरा वेचकांचे कुटूंब उध्दवस्त होईल. त्यांच्या जिवनमरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. कचरा वेचक महिला पालिका प्रशासनास कचरा वर्गीकरण करण्यास मदत करीत असतात. या कचऱ्यातून अनेक पुनर्वापर वस्तु, कचरा गोळा करुन २०० कचरावेचक महिला आपली उपजिविका चालवून कुटूंबाचे पालनपोषन करतात. त्यामुळे त्यांना कचरा हस्तांतरण केंद्रावर प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी कचरा वेचक महिलांनी आंदोलनादरम्यान केली.
कचरा हस्तांतरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात कचरा उचलण्याचे काम सुरू असून याठिकाणी दुर्घटना घडू नये म्हणून कचरा वेचक महिलांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. परंतु त्यांच्या उपजिविकेवर परिणाम होऊ नये यासाठी पालिका त्यांच्यासाठी काय करता येईल, यावर विचार करत आहे, असे पालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी सांगितले.