३० लाखांपासून ते कोटी रुपयांच्या घरांचे पर्याय
ठाणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ राबविली असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाण्यातील बिल्डरांनीही घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहिण विशेष सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या मालमत्ता प्रदर्शनाच्या काळात घर खरेदी करणाऱ्या महिलांनी घराची २० टक्के रक्कम भरली तर, त्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. तसेच यंदाच्या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये ३० लाखांपासून ते कोटी रुपयांच्या किंमतीची घरे असणार आहेत.
‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन ठाण्यात होणाऱ्या मालमत्ता प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष राहुल वोरा, सचिन मिराणी, पदाधिकारी गौरव शर्मा आणि जय वोरा उपस्थित होते. ठाण्यातील एमसीएचआय – क्रेडाई या बिल्डरांच्या संघटनेकडून गेल्या २२ वर्षांपासून शहरात मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदाचे प्रदर्शन ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर येथे भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामुळे एकाच छताखाली ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पात घर घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होईल. तसेच घराची २० टक्के रक्कम देऊन घर खरेदी करणाऱ्या ‘लाडक्या बहीणीला’ विशेष सवलत दिली जाईल, अशी माहिती ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. या प्रदर्शनात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मोफत पार्किंगची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ठाणे पूर्व रेल्वे स्टेशनबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून प्रदर्शनस्थळापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे, असे मेहता यांनी सांगितले.
यंदाच्या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे प्रदर्शनात एका इमारतीबरोबरच प्रशस्त गृहसंकूले आणि परवडणाऱ्या घरांपासून उत्तम जीवनशैलीतील आलिशान घरे, व्हिला, कार्यालयीन जागा, दुकाने असे विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध असेल. अनेक गृहसंकूलांमध्ये छोटे वन बीएचकेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्याला अपेक्षित किंमतीनुसार घरांची निवड करता येतील. तसेच गृहसंकुलातील सुविधांचा एकत्रित आढावा घेऊन तुलना करता येईल. तसेच सुरक्षित व सोयीस्कर घराची निवड करता येईल. यामध्ये ३१५ चौरस फुटाची छोटी तर, त्याहून मोठ्या आकाराची घरे उपलब्ध असतील. यामुळे प्रदर्शनात ३० लाखांपासून पुढे कोटी रुपयांच्या घरांचे पर्याय उपलब्ध असतील. कशेळी-काल्हेर भागातील काही घरेही प्रदर्शात विक्रिसाठी असतील, असेही मेहता म्हणाले. या प्रदर्शनात ठाणे महापालिका, एमएमआरडीए यांच्यासह विविध सरकारी प्राधिकरणांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. ठाण्याच्या आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासाबाबतच्या नव्या योजनांची माहिती प्रदर्शनामध्ये मिळू शकेल. तसेच त्याबाबत सामान्य नागरिकांना आपल्या सूचना मांडता येतील, असेही ते म्हणाले.
प्रदर्शनाची वैशिष्टये
सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रदर्शन खुले, ठाणे पूर्व रेल्वे स्टेशबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बससेवा, पूर्वनोंदणी केल्यास रांगेविना प्रवेश, मोफत पार्किंग, वैलेट पार्किंगचाही पर्याय, ८० हून अधिक नामांकित बिल्डरांचे १०० हून अधिक गृह प्रकल्प स्टाॅल, १५ हून अधिक वित्त संस्था, २५ हजारांहून अधिक घरखरेदीदारांची उपस्थिती, वातानुकूलित प्रशस्त मंडप, असे प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये आहे. याशिवाय, गृहसंकुलांसाठी स्पर्धा ठेवली जाणार असून त्यातील विजेत्यांना दिड लाखांपासून ते ७५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत.