ठाणे : मुंब्रा येथे १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकारानंतर मंगळवारी रात्री उशीरा येथील महिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या प्रकरणात इतरही आरोपी आहेत त्यांनाही अटक करा अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत होती. या मोर्चात राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाडही आले होते. एकाही आरोपीला सोडले जाणार नाही असे आश्वासन त्यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. मुंब्रा शहरात अमली पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण वाढत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आव्हाड यांनी पोलिसांकडे केली.

मुंब्रा येथे सोमवारी रात्री एका १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन आसिफ मन्सुरी याने तिची हत्या केली होती. तसेच त्याने मृतदेह स्वच्छतागृहातील खिडकीतून फेकून दिला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आसिफ मन्सुरी याला अटक केली. आसिफ याच्यासह आणखी आरोपी असल्याचा आरोप महिलांनी केला. तसेच आसिफ आणि त्याचे साथिदार नागरिकांना नेहमी त्रास देत असतात असा दावा येथील रहिवाशांनी केला होता. मंगळवारी रात्री महिलांनी एकत्र येऊन मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्याप्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. आसिफ याच्या साथिदारांना ही अटक व्हावी अशी मागणी मोर्चात सहभागी महिलांनी केली. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील मुंब्रा येथे आले. त्यांनी मृत मुलीच्या आईची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर ते कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्याप्रमाणात महिला घोषणबाजी करत होत्या. त्यांनी मोर्चेकरी महिलांना एकाही आरोपीला सोडले जाणार नाही असे आश्वासन नागरिकांना दिले. मुंब्रा शहरात अमली पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण वाढत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आव्हाड यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर मोर्चात सहभागी महिला माघारी गेल्या.

त्या दिवशी नेमके काय घडले ?

– मुंब्रा येथे मृत पिडीत मुलगी तिच्या आई सोबत राहत होती. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. मुलीच्या वडिलांचे निधन झाले आहे. सोमवारी सायंकाळी मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्याचवेळी मन्सुरी तिथे आला. त्याने मुलीला खाऊ आणि खेळणी देतो असे सांगून तिला घरामध्ये नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करुन धारदार शस्त्राने मानेवर वार केला. त्यानंतर तिचा मृतदेह स्वच्छतागृहातील खिडकीमधून खाली फेकून दिला. दरम्यान, काहीतरी पडल्याचा आवाज झाल्याने इमारतीतील एका रहिवाशाने विजेरीच्या साहाय्याने पाहणी केली असता, त्यांना मुलीचा मृतदेह आढळला. त्यानंतर हे प्रकरण समोर आले.