डोंबिवली येथील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील सागाव भागातील चेरानगरमधील रविकिरण सोसायटी येथे भंगाराचा व्यवसाय करणारे चार जण या भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची दररोज छेड काढत होते. या सर्व महिलांनी मिळून मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर मानपाडा पोलिसांनी या चारही भंगार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले. यामधील तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

रूस्तम आदिल खान (४०), अश्रफ अब्दुल हमीद खान (२८), इस्तिखार अब्दुल हमीद खान (२१), अब्दुल करीम हमीद खान (२८) अशी भंगार विक्रेते आरोपींची नावे आहेत. ते चेरानगर सागाव येथील सिध्दीविनायक इमारतीमधील एका गाळ्यात भंगार खरेदी, विक्रीचा व्यवसाय करतात. या भंगार विक्री दुकानावरून दररोज या भागात राहणाऱ्या महिला मुलांना शाळेत सोडण्यासाठी, बाजारपेठेत खरेदीसाठी येजा करत असतात. यावेळी या महिलांकडे पाहून आरोपी ‘माल कितना अच्छा है,’ ‘माल कितना चिकना है’, अशी शेरेबाजी करून या महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग करत होते.

हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत अल्पवयीन कामगाराचा शॉक लागून मृत्यू

मागील अनेक दिवसांपासून हे आरोपी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांच्या भंगार दुकानासमोरून येजा करणाऱ्या महिलांविषयी अश्लिल शेरेबाजी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अनेक महिलांनी आपल्या घरी हा प्रकार सांगितला होता. हे भंगार विक्रेते दुकानाच्या बाहेर अर्धनग्न अवस्थेत खुर्चीमध्ये बसलेले असायचे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत असे.

सोबत शाळकरी लहान मुले असल्याने या महिला वाद नको म्हणून शांत राहत होत्या. त्याचा गैरफायदा आरोपी घेत होते. भंगार विक्रेत्यांचे महिलांकडे पाहून शेरेबाजी करण्याचे प्रकार वाढू लागल्याने या भागातील महिला त्रस्त होत्या. अखेर सागाव चेरानगर भागातील महिलांनी एकत्र येऊन या भंगार विक्रेत्यां विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. एका महिलेच्या तक्रारीवरून या भंगार विक्रेत्यांवर मानपाडा पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रूस्तम खान, इस्तिखार खान, अब्दुल खान यांना अटक केली आहे. अश्रफ खान पळून गेला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या विक्रेत्यांचे या भागातील दुकान बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे.