लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : लोकसभा निवडणुक काळात कल्याणमधील शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेविका आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी ठाणे येथील एका कार्यक्रमात शिंदेच्या सेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत दाखल ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवसेना वाढीसाठी आणि लोकसभा निवडणुकीत जोमाने काम करण्याच्या सूचना केल्या. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, तारांकित प्रचारक राहुल लोंढे, उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख अरूण आशान उपस्थित होते. विजया पोटे, अरविंद पोटे हे मागील ४० वर्षापासून कल्याणमध्ये शिवसेनेचे काम करत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक म्हणून पोटे दाम्पत्याने पालिकेत काम केले आहे. शिवसेनेचा कल्याणमधील एक लढवय्या आक्रमक गटातील महिला गट म्हणून पोटे यांचा गट ओळखला जात होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विजया पोटे यांंच्यासह महिला, पुरूष कार्यकर्ते यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
आणखी वाचा-तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर
शिवसेनाप्रमुखांची शिकवण, विचार शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रत्यक्ष आचरणात आणले जात आहेत. शिवसेनाप्रमुखांचे ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारणाचा विचार शिंदे यांच्या शिवसेनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरविला जात आहे. मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता फक्त १०० टक्के राजकारण केले जात आहे. त्यामुळे याठिकाणी काम करणे अवघड झाल्याने आपण शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे विजया पोटे यांनी सांगितले.
पोटे यांच्या सोबत उपशहर संघटक पल्लवी बांदिवडेकर, नमिता साहू, भारती भोसले, मंदाकिनी गरूड, मोनिका इंगळे, रंजना पाटील, वंदना पाटील या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
समर्पित कार्यकर्त्यांची गरज
राज्याला आता फेसबुकवर नव्हे तर लोकांमध्ये मिसळून काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत. ती तळमळ कल्याणमधील महिला कार्यकर्त्यांमध्ये दिसते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजया पोटे यांच्यासह इतर महिला पदाधिकाऱ्यांचा गौरव केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विकासाची अनेक कामे केली आहेत. यावेळी ते नक्कीच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. आपण केलेली विकास कामे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा आणि शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.