ठाणे शहरातील विविध घटनांमुळे रिक्षांचा प्रवास महिलांना असुरक्षित वाटू लागलेला असतानाच आता शहरामध्ये महिलाच रिक्षा चालविण्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत. अशाच एका महिला रिक्षाचालकाचा परवान्याचा मार्ग मोकळा झाला असून ती त्या परवान्याद्वारे शहरात रिक्षा चालविण्याचे काम करणार आहे. यापूर्वी महिलांच्या नावे रिक्षांचे परवाने मिळत होते, मात्र त्या रिक्षा चालविण्याचे काम करीत नव्हत्या. त्यामुळे ठाणे जिल्ह्य़ामध्ये रिक्षा चालविणारी ती पहिली परवाधारक महिला चालक ठरली आहे.
ठाणे येथील रामनगर भागात जान्हवी महेंद्र आवटे राहत असून त्या गेल्या १० वर्षांपासून ऑटो स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांचे पती महेंद्र हेसुद्धा हाच व्यवसाय करीत असून जान्हवी यांनी त्यांच्याकडून रिक्षा दुरुस्ती व चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. २००९ मध्ये त्यांनी रिक्षा चालविण्याचा परवाना आणि बॅच काढला असून त्या रिक्षा चालविण्याचे काम करीत नव्हत्या. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी रिक्षा चालविण्याचे काम सुरू केले, मात्र त्यांच्याकडे रिक्षा परवाना नसल्यामुळे त्या रिक्षा भाडय़ाने घेत होत्या. या रिक्षाच्या माध्यमातून ते शहरातील पुरुष तसेच महिला प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचविण्याची सेवा पुरवीत आहेत.
२०१४ मध्ये जान्हवी आवटे यांनी रिक्षा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला होता, परंतु त्यामध्ये त्यांचे नाव प्रतीक्षा यादीत होते. यंदाच्या वर्षांत ही यादी पुढे सरकताच त्यांना अखेर रिक्षा परवाना मिळाला. ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर यांच्या हस्ते गुरुवारी तिला रिक्षा परवान्यासाठी इरादा पत्र देण्यात आले. त्यामुळे तिला आता स्वत:ची रिक्षा घेऊन चालविणे शक्य होणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली. तसेच ठाणे जिल्ह्य़ातील ती पहिली महिला परवानाधारक रिक्षाचालक ठरली आहे, असा दावाही त्यांनी केला. त्याचप्रमाणे रिक्षा परवान्यासाठी १२० महिलांनी अर्ज केल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वत: रिक्षा चालविणार..
ऑटो स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय करीत असतानाच पती महेंद्र यांच्याकडून रिक्षा दुरुस्ती व चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर रिक्षा चालविण्याचा परवाना आणि बॅचही मिळविला. रिक्षा चालविण्याची आवड असल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यवसाय करते. शहरातील अन्य रिक्षाचालकांकडूनही खुप सहकार्य मिळते. रिक्षा परवाना मिळाल्यामुळे आता स्वत:ची रिक्षा घेणार असून ती शहरात स्वत: चालविणार आहे. या व्यवसायासाठी पती महेंद्र आणि मुलगा कौस्तुभ यांच्याकडून खूप सहकार्य मिळत आहे, अशी प्रतिक्रीया जान्हवी आवटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.