डोंबिवली- मध्य रेल्वे मार्गावरील लोकलने दररोज हजारो महिला मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. या महिलांचा सुखकर, सुरक्षित, सोयीचा प्रवास यादृष्टीने मध्य रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याने त्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला रेल्वे प्रवाशांनी आज काळ्या फिती लावून प्रवास केला.
मध्य रेल्वे मार्गावरील कसारा, कर्जत ते सीएसएमटी रेल्वे मार्गावर दररोज हजारो महिला नोकरी, व्यवसायानिमित्त प्रवास करतात. या महिलांचा सुखकर प्रवास व्हावा, सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना कराव्यात यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका, निवेदने देऊनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याने त्याचा निषेध करण्यासाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी महिला दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
हेही वाचा >>> ठाण्यात भाजपाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
यावेळी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ, डोंबिवली रेल्वे प्रवासी संघटना, कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला प्रतिनिधी या निषेध आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. संघटनेच्या प्रतिनिधींकडून रेल्वे फलाटावर येणाऱ्या प्रत्येक महिलेच्या खांद्याच्या दिशेने पेहरावावर काळी फित लावली जात होती. काळी फित लावलेली प्रत्येक महिला या उपक्रमात सहभागी होत होती. या उपक्रमात सर्व महिला प्रवासी उत्स्फूर्त सहभागी झाल्या होत्या.
लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस, मेल गाड्यांसाठी तत्पर असलेले रेल्वे प्रशासन लोकलने दररोज हजारोच्या संख्येने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना सुविधा देण्यास टाळाटाळ का करत आहे. या महिलांच्या तिकीट, पासाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल रेल्वेला मिळतो. हे माहिती असुनही महिलांना हेतुपुरस्सर रेल्वे सुविधा देण्यास टाळाटाळ करत असेल तर आता महिला प्रवासी गप्प बसणार नाहीत, असा इशारा उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे यांनी दिला.
हेही वाचा >>> ठाण्यात गारांचा पाऊस
निषेध उपक्रमात प्रवासी संघटनेच्या लता अरगडे, अनिता झोपे, नीला भागवत, रेखा जाधव, नाझीमा सय्यद, राजश्री पाजनकर, सायली शिंदे, रेखा देढिया सहभागी झाल्या होत्या.
शटल सेवा
ठाणे रेल्वे स्थानकावर नवी मुंबई, मुंबई, खासगी वाहने, बसने पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांचा भार पडत आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक गर्दीने सतत ओसंडून वाहते. या गर्दीचे विभाजन करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातून ठाणे ते कर्जत-कसारा सकाळ, संध्याकाळ शटल सेवा सुरू करावी. मेट्रोमुळे घाटकोपर येथून पश्चिम उपनगरचा जाणाऱ्या प्रवाशांचा भार अधिक आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत घाटकोपर येथून टिटवाळा, आसनगाव, बदलापूर, कर्जत, कसारा भागात विशेष लोकल सोडण्यात याव्यात. यामुळे प्रवाशांचे विभाजन आणि महिलांना सुखकर प्रवास करणे सोयीचे होणार आहे, असे अरगडे यांनी सांगितले.
गेल्या २० वर्षापूर्वी लोकलला जेवढे महिलांसाठी राखीव डबे होते. त्याच्यात थोडेफार बदल केले असले तरी मोठ्या प्रमाणात महिलांसाठी प्रवासी आसनक्षमतेचे डबे वाढविण्यात आले नाहीत. प्रथम श्रेणीचा पास, तिकीट काढुनही आता गर्दीमुळे सुखकर प्रवास करता येत नाही. या सर्व समस्या रेल्वे प्रशासनाला माहिती असुनही अधिकारी त्याकडे का लक्ष देत नाहीत. रेल्वेचे बहुतांशी अधिकारी परप्रांतीय असल्याने आणि त्यांना स्थानिक भौगोलिक माहिती नसल्याने ते फक्त आलेल्या सूचना ऐकून घेण्या व्यतिरिक्त प्रवाशांच्या सूचना अंमलात आणण्यासाठी कोणतीही कृती करत नाहीत, अशी तक्रार अरगडे यांनी केली.
वातानुकूलित लोकलमधून सामान्य लोकलचे तिकीट असणारा प्रवासी करत आहेत. रेल्वे स्थानकांमधील पुलांवर फेरीवाल्यांचे बस्तान असते. डब्यात भिकाऱ्यांचा उपद्रव असतो. या सगळ्या गोष्टींचा बिमोड करावा, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.
फेरीवाले उपद्रव
रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा जवान,पोलिसांची गस्त असताना महिलांच्या डब्यात पुरुष फेरीवाले शिरतात. या फेरीवाल्यांना हटकले तर ते उलट उर्मट उत्तरे देतात. या फेरीवाल्यांशी कोणाशी लागेबांधे असल्याशिवाय ते अशी हिम्मत करणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.
“महिला प्रवाशांच्या सुखकर, सुरक्षित प्रवासाकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नाही. अनेक वेळा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या, निवेदने दिली. तरीही त्याची दखल घेतली जात नसल्याने रेल्वे मंत्र्यांसह वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी हे निषेध आंदोलन केले जात आहे.”
लता अरगडे- सरचिटणीस उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.